‘सत्संग’ – साधनेतील एक महत्त्वाचा टप्पा !

१. ‘सत्संगाचे’ महत्त्व आणि सत्संग श्रवण करण्याची आवश्यकता ! 

‘प्रतिदिन सत्संग ऐकल्यामुळे हळूहळू आपल्या विचारांत परिवर्तन होऊ लागते. सर्वांत महत्त्वाची साधना आहे, ती म्हणजे आपल्या अयोग्य विचारांना लगाम घालून योग्य विचार करता येणे. ‘विचार कसा करायचा ?’ हे शिकणे, ही महत्त्वाची साधना आहे. ‘विचार कसा करायचा ?’ हे समजले पाहिजे.

हे शिकण्यासाठी साधकाने प्रतिदिन २ वेळा सत्संग श्रवण करण्याची आवश्यकता आहे. सत्संगात एखादे निरूपणकार तीच तीच सूत्रे किंवा उदाहरणे देत असले, तरी ती श्रद्धेने ऐकतांना प्रत्येक वेळी त्यांतून वेगवेगळे अर्थ लक्षात येतात. हे वेगवेगळे अर्थ लक्षात येण्याची प्रक्रिया कशामुळे होते ?, तर ऐकणार्‍याची बुद्धी अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. त्यामुळे शब्द तेच असले, तरी त्या शब्दांचे नवीन अर्थ लक्षात येतात. ऐकणार्‍याच्या मनाच्या स्थितीवर ऐकू येणार्‍या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे मनाची स्थिती अतिशय महत्त्वाची असते.

श्री. प्रकाश करंदीकर

२. साधकाच्या बुद्धीची समज वाढल्यामुळे सत्संगात तीच तीच सूत्रे पुनःपुन्हा ऐकतांना त्यांतील नवीन अर्थ ध्यानी येऊ लागणे 

एक उदाहरण पाहू. समजा तुम्हाला पुष्कळ भूक लागली आहे. कधी एकदा ‘काहीतरी खातो’, अशी तुमची स्थिती झाली आहे. इतक्यात तुम्हाला एक भ्रमणभाष येतो. समोरची व्यक्ती ‘तुमच्या जवळच्या मित्राला अपघात झाला आहे. तुम्ही लवकर या’, असा निरोप देते. त्या क्षणी पुष्कळ भूक लागलेली असूनही तुमचे खाण्याचे विचार थांबतात आणि ‘मित्राच्या साहाय्याला गेले पाहिजे’, असे विचार येऊ लागतात. आपली समज आपल्या विचारांवर अवलंबून असते. सत्संगात अनेक वेळा तीच तीच सूत्रे सांगतात, उदा. देहबुद्धी न्यून करा, वासना आणि अपेक्षा यांमध्ये अडकू नका; परंतु प्रत्येक वेळी आपली समज वाढल्यामुळे त्याच सूत्रांतूनही आपल्याला वेगवेगळे समजते.

३. ‘श्रवण करणे’ हे भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार असल्याने सत्संगातील विषयांचे श्रवण करून त्यांचा दृढतेने स्वीकार करावा आणि ते श्रद्धेने कृतीत आणावे ! 

‘श्रवण करणे’ हे भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार आहे’, असे म्हटले आहे. पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमांतून ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला ‘दृश्य पहाणे आणि श्रवण करणे’, यांनी आरंभ होतो. या दोन्ही प्रक्रियेत ‘ऐकणे’, म्हणजेच ‘श्रवण’ या प्रक्रियेपासून ज्ञान मिळण्यास सर्वांत आधी आरंभ होतो, तसेच श्रवणाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान अधिक काळ स्मरणात रहाते. त्यामुळे ‘श्रवण’ हा नवविधा भक्तीतील सर्वांत पहिला चरण आहे.

व्यवहारात एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायचे असल्यास आपण त्या व्यक्तीची अधिकाधिक माहिती गोळा करतो, म्हणजे ‘ती व्यक्ती दिसते कशी ? काम काय करते ? तिच्या आवडीनावडी कोणत्या आहेत ?’ इत्यादी. त्याचप्रमाणे ‘ज्या देवतेची उपासना करावी’, असे आपल्याला वाटते, त्या देवतेविषयी जाणून घेण्यासाठी ‘तिची वैशिष्ट्ये कोणती आहेत ? तिच्या प्राप्तीसाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, हे सर्व आधी श्रवण केल्याविना आचरणात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे ‘श्रवण’ हा भक्तीचा पहिला टप्पा आहे. भक्तीच्या या प्रकारात ‘भगवंताचे गुण श्रवण करणे आणि नंतर ते आपल्या हृदयात साठवून ठेवणे अन् आत्मसात करून कृतीत आणणे, हे सोपे होते.

नवविधा भक्ती

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मानिवेदनम् ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ७, अध्याय ५, श्लोक २३

अर्थ : १. श्रवण, २. कीर्तन, ३. नामस्मरण, ४. पादसेवन, ५. अर्चन (पूजा), ६. वंदन, ७. दास्य, ८. सख्य आणि ९. आत्मनिवेदन.

एका गृहस्थाने श्रीमद्भगवत्गीता कंठस्थ करायचे ठरवले आणि ‘त्यासाठी मी काय करू ?’, असे एका ज्ञानी गृहस्थाला विचारले. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, ‘‘इतकी वर्षे मी गीतेचे वाचन करत आहे; पण मला ती अजूनही कंठस्थ झाली नाही; पण मी ती श्रद्धेने वाचल्यामुळे हृदयस्थ जरूर झाली आहे. गीतेतील ज्ञानाचा माझा अभ्यास झाला आहे. आता माझे विचार पालटले असून माझी कृतीही पालटली आहे. त्यामुळे ‘गीता ‘कंठस्थ’ करण्याऐवजी ‘हृदयस्थ’ कशी करता येईल ?’ यासाठी प्रयत्न कर.’’

कंठस्थ केल्याने गीता नुसती म्हणता येईल; पण त्याचा काहीच उपयोग नाही; म्हणून ‘श्रवणाधिकांचा अभ्यास’ म्हणजे श्रवण करावे; पण ते कसे करावे, तर ‘येथेची धरी विश्वास निरंतर’, म्हणजे जे श्रवण केले, ते दृढतेने स्वीकारावे ! श्रद्धा ठेवून ते कृतीत आणावे आणि त्याचा अभ्यास करावा.

४. साधनेचे विविध स्तर साधनेचे विविध स्तर पुढीलप्रमाणे आहेत. 

४ अ. पारंपरिक साधना : ज्या घरात आपल्याला जन्म मिळाला, त्या घरातील पूजा, परंपरा, कुळाचार आदींचे श्रद्धेने पालन करावे. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजातील प्रथा आणि परंपरा यांचे आचरण करणे आवश्यक असते. त्यामुळे आपण त्या परंपरांशी जोडलेले रहातो. ‘गर्व से कहो हम हिंदू है ।’ किंवा ‘हम भारतीय है’ । असे आपण म्हणतो, तेव्हा नकळत आपण या श्रेष्ठ परंपरांशी जोडलेले रहातो. श्रेष्ठ परंपरांशी जोडलेले रहाणे, हे व्यक्तीमध्ये ‘आत्मसन्मान’ निर्माण करते; म्हणून परंपरागत साधना केली पाहिजे.

४ आ. बहिरंग साधना : मंदिरात जाणे, प्रदक्षिणा घालणे, दानधर्म करणे, योगासने आणि प्राणायाम करणे, तसेच मोठ्यांशी आदरपूर्वक आचरण करणे, हे सर्व बहिरंग साधनेत येते. हठयोगामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे बहिरंग साधनेचे प्रकार आहेत.

४ इ. अंतरंग साधना : हठयोगाच्या मार्गातील ‘धारणा’, ‘ध्यान’ आणि ‘समाधि’ हे अंतरंग साधनेचे प्रकार आहेत.

५. वेदांताच्या मार्गात ‘श्रवण, मनन आणि निदिध्यास’ ही ‘अंतरंग साधना’ असणे 

वेदांताच्या मार्गात ‘श्रवण, मनन आणि निदिध्यास’ हे साधनेचे ३ टप्पे सांगितले आहेत. ‘श्रवण, मनन आणि निदिध्यास’ हे सर्व टप्पे मनानेच करायचे असतात. श्रवण केल्यावर त्याचे मनन करावे, म्हणजे मनाला ते स्पष्ट व्हायला हवे. त्यात कोणताही किंतु-परंतु नसावा आणि ‘निदिध्यास’ म्हणजे नियमित अन् चिकाटीने साधना करणे.

५ अ. विविध उपाधींतील अनेकता हे सत्य नसणे : मनुष्य जन्माला येतांना तो केवळ मनुष्य म्हणून येतो. पुढे त्याला नाती चिकटतात आणि नातलगही निर्माण होतात, उदा. नातू, मुलगा, आई, वडील, बहीण, आत्या, मावशी इत्यादी. मनुष्य जेव्हा दुःखी होतो, तेव्हा नात्यांची ही उपाधी लावलेला आणि नातेवाइकांची भूमिका करणारा तो दुःखी होतो. एकाच झाडावर अनेक फांद्या आणि पाने असतात. त्या फांद्या आणि पाने एकमेकांचे बहीण-भाऊ असतात का ? एकाच झाडावरील अनेक फुले किंवा फळे एकमेकांचे नातेवाईक असतात का ? त्या झाडाचे एखादे फळ पिकून खाली पडले, तर झाडावर असलेले फळ रडते का ? एकाच आईची मुलेही किती भिन्न भिन्न असतात. त्यामुळे आपण समजून घेतले पाहिजे की, या उपाधींतील अनेकता हे सत्य नाही.

५ आ. सर्व अनेकतांचा ‘मी’ हा एकच मूळ आधार असणे : आपले स्वतःचेच उदाहरण घेऊ. आपला जन्म झाला. तेव्हा आपले शरीर आणि अवयव लहान होते. हळू हळू ते मोठे झाले. बाळाचा लहान मुलगा होतो. नंतर तो तरुण मुलगा होतो. या प्रक्रियेतून एक गोष्ट लक्षात येते की, या सर्व अनेकतांचा एकच मूळ आधार आहे, तो म्ह‌णजे ‘मी’ ! ‘हेच माझे मूळ स्वरूप आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे. या विचारप्रक्रियेला ‘मनन’ म्हणतात. मनन केल्याने सर्व शंका आणि चिंता दूर होतात. त्यामुळेच म्हटले आहे की, ‘सत्संगाचे श्रवण प्रतिदिन करा’, त्याचे ‘मनन करा. त्यामुळे साधना चांगली होईल आणि शेवटी ‘निदिध्यासा’मुळे म्हणजे नियमित आणि चिकाटीने साधना केल्यामुळे त्यात ‘परिपक्वता’ येईल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे माझे वरील चिंतन झाले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रकाश वसंत करंदीकर (वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा.

(२०.७.२०२४)