परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत तुकाराम महाराज यांची वैराग्यवृत्ती अन् शिकवण यांतील साम्य ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘साधकांनी गुरूंना लौकिक गोष्टी देण्याऐवजी साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, हे तत्त्व कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! 

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उच्च प्रतीच्या सुख-सोयी मिळणे सहज शक्य असूनही ते त्यांपासून अलिप्त रहातात, तसेच त्यांचे जीवन वैराग्यपूर्ण आहे. या संदर्भातील एक उदाहरण पुढे दिले आहे.

वर्ष २००२ मध्ये नाशिक येथे सनातन संस्थेच्या कार्यासाठी तात्पुरते एक सेवाकेंद्र मिळाले होते. त्यातील एक खोली परात्पर गुरु डॉक्टरांसाठी होती. त्या खोलीत पलंग, आसंदी आणि अन्य आवश्यक साहित्य होते. एकदा परात्पर गुरु डॉक्टर एका सेवेसाठी गोव्याहून नाशिकला येणार होते. तेव्हा एका साधकाच्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टरांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांची रहाण्याची उत्तम सोय व्हावी’, यांसाठी स्वतःच्या घरातील मौल्यवान साहित्य, फर्निचर, पलंग इत्यादी सेवाकेंद्रात आणावे.’ त्या साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील साहित्य पालटून तेथे त्याच्या घरातील सर्व नवीन साहित्य ठेवले.

श्री. राम होनप

दुसर्‍या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर गोव्याहून नाशिक येथे आले. त्यांनी त्यांची खोली पाहिली आणि उत्तरदायी साधकाला म्हणाले, ‘‘तुम्ही तर कमालच केली ! माझी खोली पंचतारांकित हॉटेलमधील खोलीप्रमाणे केली आहे. असे करणे योग्य नाही. ‘त्या साधकाला वाईट वाटू नये’, यासाठी मी जोपर्यंत नाशिकला आहे, तोपर्यंत हे साहित्य माझ्या खोलीत असू द्या. मी गोव्याला परत गेल्यावर साधकाने माझ्यासाठी दिलेले साहित्य त्याच्या घरी पोचवा.’’

त्यानंतर २ – ३ दिवसांनी नाशिक जिल्ह्यातील साधकांसाठी एक सत्संग होता. त्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वरील प्रसंग सांगून असे मार्गदर्शन केले, ‘‘हा आपला आश्रम आहे. त्याचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये करू नये. माझ्यासाठी साधकांचा भाव महत्त्वाचा आहे. साधकांनी अशा लौकिक गोष्टींमध्ये न अडकता साधना करून ईश्वरप्राप्ती केलेली मला आवडेल.’’

आताही परात्पर गुरु डॉक्टरांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील त्यांच्या खोलीत पूर्वीपासूनच एक पलंग, लिखाणासाठी एक पटल, आसंदी आणि कपाट, असे केवळ आवश्यक साहित्य आहे. यावरून त्यांच्या वैराग्यवृत्तीचे दर्शन घडते.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देऊ केलेल्या मौल्यवान भेटवस्तू स्वीकारण्यास नकार देऊन त्यांना साधना करण्याचा उपदेश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज !

नाशिकमध्ये घडलेल्या वरील प्रसंगी मला ‘संत तुकाराम’, या जुन्या चित्रपटातील एक प्रसंग आठवला. त्यात एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका सेवकाद्वारे तुकाराम महाराज यांना उच्च प्रतीची वस्त्रे आणि सोन्याचे अलंकार भेट देतात. तेव्हा संत तुकाराम महाराज ती भेट स्वीकारण्यास नकार देतात. तो सेवक संत तुकाराम महाराज यांना म्हणतो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे.’’ त्या वेळी संत तुकाराम महाराज त्याला पुढील ओव्यांद्वारे उत्तर देतात.

आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।।

तुमचें येर वित्त धन । हे मज मृत्तिकेसमान ।।

कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ।।

म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘विठ्ठलाच्या स्मरणातच आम्हाला खरा आनंद आहे. तुमच्याकडील धन आणि संपदा मला मातीप्रमाणे आहे. याविषयी आमचे एकच सांगणे आहे, ‘गळ्यात तुळशीची माळ घाला. एकादशीचे व्रत करा.’ ‘तुम्ही हरीचे दास व्हावे’, ही माझी इच्छा आहे.

यावरून ‘संत तुकाराम महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीत साम्य आहे’, हे लक्षात येते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२४)