सांगली – अवेळी आणि मुदतपूर्व घेतल्या जाणार्या निवडणुकांमुळे विकासाला खीळ बसत आहे. टक्केवारी आणि बेरजेच्या राजकारणामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न आज आपल्या देशासमोर उभे आहेत. ‘एक देश एक निवडणूक’मधून या समस्यांवर उपाय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ते ‘लायन्स क्लब ऑफ सांगली सिटी’च्या वतीने आयोजित ‘सजग रहो अंतर्गत’ मतदार जागृती व्याख्यानात बोलत होते.
डॉ. उदय निरगुडकर पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक हे लोकशाहीचे अंग असले, तरीही निवडणुका झाल्या म्हणजे लोकशाही आली, असे म्हणता येत नाही. पाकिस्तानात निवडणुका होतातच; परंतु तेथील लोकशाहीची कशी दुरवस्था झाली आहे ? हे सर्व जग पहात आहे. पाकिस्तान, बांगलादेश, चीन, श्रीलंका, म्यानमार येथे जरी निवडणुका होत असल्या, तरीही त्यातून प्रत्यक्षात तेथे लोकतंत्र कसे काय चालते ? हे सर्व जग पहात आहे. अल्पसंख्यांकांचे अती लांगूलचालन आणि त्यातून निर्माण होत असलेली ‘अनीती आणि अनुशासन’ यांमुळे भारतातील बंगालसारखी राज्ये रसातळाला गेली आहेत.’’