आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी गुंतवणूक कराडमध्ये करणार ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कराड, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना अगदी थोड्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. ती कसर या वेळी भरून काढत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. मी त्यांना मंत्रीपद देण्यासाठी कटीबद्ध आहे. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी गुंतवणूक कराडमध्ये करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, ‘‘सातारा ही वीरांची भूमी असून येथील वीरांना आणि वीरमातांना मी प्रणाम करतो. मोदींनी ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेतून सहस्रो कोटी रुपये सैनिकांच्या कुटुंबांना दिले आहेत. प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? भाजपच्या माध्यमातून कराडला मोठा उड्डाणपूल आकाराला येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही कराड दक्षिणमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार आहेत, तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला पक्के घर देऊन झोपडपट्टीमुक्त कराड करण्यात येणार आहे.