आम्ही ब्रिटनमधील लोक अनभिज्ञ आहोत !

प्राचीन भारताने पाश्चिमात्यांच्या प्रगतीला कसा आकार दिला, याविषयी लपवली गेलेली कथा !

गणित, खगोलशास्त्र आणि अन्यही बर्‍याच विषयांसंदर्भात भारतातून युरोपमध्ये गेलेल्या ज्ञानाची इतिहासकारांनी नोंद घेतलेली नाही. मूळ भारतीय ज्ञानाचा पाश्चिमात्य देशांपर्यंत झालेला आणि पुन्हा भारताकडे झालेला प्रवास यांविषयी विलियम डर्लिंपल यांनी लिहिलेला ‘द गार्डियन’ संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेला लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहाेत.

ब्रह्मगुप्त

१. ब्रह्मगुप्तांनी ‘शून्या’वर संशोधन करून गणितावर लिहिलेला ग्रंथ

विलियम डर्लिंपल

इसवी सन ६२८ मध्ये राजस्थानमध्ये एका डोंगरावर रहाणार्‍या ऋषीने ‘गणित’ या विषयातील जगातील महत्त्वाचा शोध लावला. थोर गणितज्ञ ब्रह्मगुप्त (इसवी सन ५९८ ते ६७०) यांनी ‘शून्यता’ किंवा ‘शून्य’ या भारतीय तत्त्वज्ञानातील संकल्पनेवर संशोधन केले अन् ‘शून्य’ या संकल्पनेची निश्चित व्याख्या देणारा ग्रंथ निर्माण केला. राजस्थानमधील थंड हवेचे ठिकाण असलेल्या ‘माऊंट अबू’जवळ ब्रह्मगुप्ताचा जन्म झाला. ३० वर्षांचा असतांना त्याने २५ प्रकरणे असलेला ‘गणित’ या विषयावरील ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला लगेच ‘असामान्य सूक्ष्म आणि अलौकिक बुद्धीमत्ता वापरून निर्माण केलेला ग्रंथ’, अशी मान्यता मिळाली. ‘शून्याला गोल आकार देणारा’ तो पहिला गणितज्ञ ठरला. त्यापूर्वी काही नाही, असे दाखवण्यासाठी शून्याच्या ऐवजी अन्य अंकांप्रमाणे केवळ एक ठिपका वापरला जात होता. शून्याचा शोध लागल्यानंतर अन्य ९ अंकांसह शून्याचा वापर करून अंकगणितातील नियम विकसित करण्यास साहाय्य झाले. गणितातल्या या मूलभूत नियमांमुळे पहिल्यांदाच अनंततेपर्यंत कोणतीही संख्या १० वेगवेगळ्या आकड्यांद्वारे (आधीच्या पिढीतील गणितज्ञांनी शोधून काढलेले ९ अंक आणि शून्य मिळून) दाखवता येऊ लागली. हे नियम आजही जगभरात शाळांतील वर्गांतून शिकवले जात आहेत.

२. अंकगणितातील नियमांचे आणि गुरुत्वाकर्षाविषयी संशोधन करणारे ब्रह्मगुप्त !

ब्रह्मगुप्ताचे दुसरे संशोधन, म्हणजे त्याने ‘घन’ आणि ‘ऋण’ संख्यांची मोजणी करण्याविषयी अंकगणितातील नियम शोधून काढले, जे त्याने संस्कृत श्लोकांमध्ये लिहिले आहेत. त्याने केलेल्या दुसर्‍या काही लिखाणांनुसार आयझॅक न्यूटनच्या आधी सहस्र वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाविषयी लिहिणारा तो पहिला गणितज्ञ असावा; परंतु यामध्ये केवळ ब्रह्मगुप्ताचे योगदान नव्हते. तो ‘स्वतःच्या पूर्वीचे अलौकिक बुद्धीमत्ता असणारे आर्यभट्ट (इसवी सन ४७६ ते ५५०) यांच्या आधारावर हे सर्व केले’, असे मानत होता. आर्यभट्ट यांनी गणिताच्या क्षेत्रात केलेले काम, म्हणजे त्यांनी गणितातील ‘पाय’ या अक्षराची किंमत ‘३.१४६’ असल्याचे शोधून काढले, तसेच त्यांनी ‘त्रिकोणामिती’चा अभ्यास केला. त्यांची पद्धत वापरून गणना करणे सोपे जाऊ लागले. या पद्धतीचा थेट खगोलशास्त्रामध्ये उपयोग होऊन त्यामुळे ग्रहांची हालचाल, ग्रहण, पृथ्वीचा आकार, तसेच सौरवर्षाची लांबी सातव्या दशांश स्थानापर्यंत अचूकपणे सांगता येऊ लागली. यासह त्यांनी ‘पृथ्वीचा आकार गोलाकार असून ती स्वतःभोवती फिरत आहे’, असे अचूकपणे वर्तवले होते. ते म्हणाले, ‘‘ब्रह्माच्या आशीर्वादाने मी या सिद्धांतांच्या सागरात खोलवर गेलो आणि या सागरातील ज्ञानाविषयीची मौल्यवान रत्ने माझ्या बुद्धीरूपी होडीमध्ये भरून आणली.’’

३. पाश्चिमात्यांना ठाऊक नसल्या, तरी भारताची शिकवण, धार्मिक दृष्टीकोन आणि संकल्पना जगासाठी पायाभूत !

या दोन माणसांच्या गणिताचा अभ्यास करण्याविषयीच्या संकल्पना पहिल्यांदा अरब राष्ट्रांमध्ये गेल्या आणि त्यानंतर पश्चिमी राष्ट्रांकडे पोचल्या. त्यांच्या संकल्पनांमधून आपल्याला केवळ शून्यासारखे महत्त्वाचे गणितातील दृष्टीकोन मिळाले नाहीत, तर आज आपण मोजणीसाठी वापरत असलेले अंकही मिळाले. ब्रिटनमध्ये आमच्या शिक्षणामध्ये ‘प्राचीन काळातील महान वैज्ञानिक प्रगती ही प्राचीन ग्रीसमधील बुद्धीमत्तेचे फळ आहे’, असे मानले जाते. आपण प्राथमिक शाळेत ‘पायथागोरस’ आणि ‘आर्किमिडीस’ यांच्याविषयी शिकतो; परंतु भारतीय पार्श्वभूमी असलेले त्याच दर्जाचे गणितज्ञ आपल्यापैकी बहुतांश जणांना ठाऊक नाहीत. आपल्या देशात एखादा छोटा शैक्षणिक गट सोडला; तर ब्रह्मगुप्त किंवा आर्यभट्ट ही नावे देशात कुणालाही ठाऊक नाहीत. जगात सध्या वापरात असलेली अंकांविषयीची पद्धतीविषयी युक्तीवाद केला, तर जगातील सर्व मानवांसाठी उपयुक्त अशी पद्धती या दोघांनी परिपूर्ण केली. तरी आपण याचे श्रेय अंक ज्यांनी शोधून काढले, त्या भारतियांना देण्याऐवजी या अंकाविषयीचे श्रेय ज्यांच्याकडून उधारीवर ते घेतले, त्या अरबांना देतो. आश्चर्य म्हणजे प्राचीन काळात आणि मध्ययुगाच्या आरंभीच्या काळात ‘संस्कृतीचे इंजिन’ अन् ‘आर्थिक आधार’ म्हणून असलेल्या भारताच्या स्थानाविषयी आपण ब्रिटनमध्ये अज्ञानी आहोत. जरी पाश्चिमात्यांना भारताची शिकवण, धार्मिक दृष्टीकोन आणि संकल्पना ठाऊक नसल्या, तरी त्या संकल्पना या जगासाठी पायाभूत आहेत.

४. कोणत्याही भागावर विजय मिळवून नव्हे, तर सांस्कृतिक आकर्षण आणि सुसंस्कृतपणा यांमुळे अन्य देश भारताकडे ओढले गेले !

प्राचीन ग्रीसप्रमाणे, प्राचीन भारतामध्ये जग म्हणजे काय आहे ? ते कसे चालते ? आपण इथे का आहोत ? आणि आपण आपले जीवन कसे जगावे ? या प्रश्नांची गहन उत्तरे दिली आहेत. प्राचीन काळी इतर भूमध्य भाग आणि युरोपीयन जग यापेक्षा ग्रीसला महत्त्व होते. त्याच काळात आग्नेयकडचा भाग, केंद्रीय आशिया आणि चीन हे भारताकडे पहात होते. तेव्हा तत्त्वज्ञान, राजकीय संकल्पना आणि वास्तूरचनेचे प्रकार याविषयी भारतातून या सर्व भागांकडे उत्सर्जन किंवा प्रसारण होत होते. हे सर्व कोणत्याही भागावर विजय मिळवून नव्हे, तर त्या ऐवजी केवळ सांस्कृतिक आकर्षण आणि सुसंस्कृतपणा असल्याने झाले होते. ख्रिस्तपूर्व २५० पासून १२०० या १ सहस्र ५०० वर्षांच्या कालावधीत भारत अतिशय आत्मविश्वासाने त्याची वैविध्यपूर्ण संस्कृती निर्यात करत होता. त्यामुळे भारताने आपल्या भोवती वेगवेगळ्या संकल्पनांचे साम्राज्य निर्माण करून एक मूर्त स्वरूपातील वलय निर्माण केले होते आणि यामध्ये सांस्कृतिक प्रभावाचे वर्चस्व होते.

या काळामध्ये आशियातील इतर भाग आरंभी भारतीय मृदु सत्तेतील धर्म, कला, संगीत, नृत्य, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, गणित, औषधे, भाषा आणि साहित्य इत्यादींच्या सर्वसमावेशक मोठ्या प्रमाणात हस्तांतरणाला सिद्ध आणि उत्सुक होता. त्या वेळी भारतातून आद्यप्रर्वतक ठरलेले व्यापारी, खगोल शास्त्रज्ञ, ज्योतिषी, वैज्ञानिक, गणितज्ञ, वैद्य आणि शिल्पकार भारताबाहेर गेले. भारतातील हिंदू आणि बौद्ध या धर्मांतील धार्मिक विचार आणि भक्ती यांचा प्रसार करणारी माणसे, साधू अन् धर्मप्रसार करणारे यांचाही यात समावेश होता. हे वेगवेगळे धर्म काही वेळा एकमेकांत मिसळले, काही वेळा त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली, तर कधीतरी त्यांच्यामध्ये संघर्ष झाला; परंतु त्यांच्यामध्ये त्यांचे दक्षिण, मध्य, आग्नेय आणि पूर्व आशिया या प्रदेशांवर वर्चस्व होते.

जगातील अर्ध्याहून अधिक लोक आज ज्या ठिकाणी एकेकाळी धर्म आणि संस्कृती याविषयी भारतीय संकल्पना होत्या अन् पुरुष आणि महिला यांच्या भारतीय देवतांची कल्पना मानत होते, अशा भागात आजही रहातात. श्रीलंका, तिबेट, चीन, कोरिया, जपान येथील बौद्ध धर्म किंबा ब्रह्मदेश, थायलंड, लाओस येथे असलेली रामायण आणि महाभारत या ग्रंथांतील भित्तीचित्रे-शिल्पे अन् बाली येथील हिंदू मंदिरे यांच्यावर नेहमीच सुप्त रूपात प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव  होता, तरीही या सर्वांना एका सांस्कृतिक केंद्रामध्ये जोडणारा होता, तो समुद्री व्यापाराचा सोनेरी मार्ग होता. त्यामुळे लाल समुद्र ते प्रशांत महासागर हा भाग या सर्व स्थळांना जोडणारा किंवा तेथील संकल्पना जोडणारा आहे, याला मान्यता मिळाली नाही आणि त्याला कोणतेही नाव देण्यात आले नाही.

(क्रमश:)

(साभार : ‘द गार्डियन’चे संकेतस्थळ)