१. श्री. दीपक रामचंद्र छत्रे (कु. अवनी आणि कु. सुरभी यांचे वडील), रायंगिणी, बांदोडा, गोवा.
‘माझ्या जीवनातील चांगल्या गोष्टी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच घडल्या आहेत. मी निमित्तमात्र आहे. त्यांपैकी एक, म्हणजे माझ्या दोन्ही मुली (कु. अवनी आणि कु. सुरभी) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. मुलींना संस्कारक्षम करण्यात मला माझ्या पत्नीचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. मुलींनी साधना करावी; म्हणून माझ्याकडून प्रयत्नपूर्वक घडलेल्या कृती येथे दिल्या आहेत.
१. दोन्ही मुलींनी चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील मालिका पाहू नयेत; म्हणून आम्ही उभयतांनी या गोष्टी कटाक्षाने सीमित ठेवल्या.
२. आम्ही मुलींना सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, शाळेत जातांना आणि येतांना, अन्नग्रहण करण्यापूर्वी, अभ्यास करण्यापूर्वी, प्रवास करतांना इत्यादी वेळी कटाक्षाने प्रार्थना करण्याची आठवण केली.
३. आमच्या मनावर ‘गुरुकृपायोग’ ठसावा; म्हणून आम्ही रहात असलेल्या सदनिकेच्या प्रवेशद्वारावर माझ्या नावाच्या पाटीऐवजी ‘गुरुकृपायोग सनातन संस्था’ अशी पाटी गुरुकृपेने लावली गेली.
४. ‘घर म्हणजे परम पूज्य डॉक्टरांचा आश्रम आहे’, असा भाव सदोदित आमच्या मनात राहू दे’, अशी प्रार्थना लहानपणापासून मुलींच्या मनावर बिंबवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला.
५. मी मुलींना समवेत घेऊन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणत असे आणि सत्संगात सांगितल्याप्रमाणे आम्ही घरात सामूहिक मानसपूजा करत होतो.
६. मी मुलींना वाचण्यासाठी देवता आणि संत यांच्या गोष्टी असलेली लहान पुस्तके आणून देत असे.
७. ‘शालेय जीवनापासूनच प्रत्येक यश मिळण्यामागे गुरुकृपाच असून, ते मनोमन गुरुचरणी अर्पण करावे’, असे मी मुलींना सांगत असे.
८. मुलींच्या मनात लहानपणापासून देवतांच्या विडंबनात्मक कार्यक्रमांविषयी चीड रुजवण्यात यश आले, तसेच लहानपणी समजावल्यानंतर मुलींनी स्वतःच फटाके फोडणे बंद केले.
९. दोन्ही मुली परीक्षेत नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्यांना विश्वासात घेऊन मी सांगितले, ‘तुम्ही किती शिकला ?’, यापेक्षा तुम्ही निष्ठावान साधक बनला, तर मला अधिक समाधान लाभेल.’ मी त्यांच्यावर शिक्षणासाठी कधीच दबाव टाकला नाही.
१०. आम्ही चारचाकीमधून कुठेही जातांना मुलींना रस्त्याच्या बाजूच्या गरीब मुलांची स्थिती दाखवून ‘गुरुकृपेने आम्ही किती सुखात आहोत ?’, हे मी उदाहरणासह पटवून दिले आणि ‘सदोदित गुरुचरणी शरण राहिलो, तरच आपले सर्वतोपरी रक्षण होईल’, असेही त्यांना समजावत राहिलो.
११. आतापर्यंत आम्ही ठरवूनच फिरायला गेलो. त्यांपैकी अनुमाने ९५ टक्के वेळा आम्ही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेलो, उदा. कुलदेव श्री हरिहरेश्वर (श्रीवर्धन, जिल्हा रायगड), श्री योगेश्वरी (अंबाजोगाई), नरसोबाची वाडी, श्री अंबाबाई (कोल्हापूर) इत्यादी. आरंभी काही वेळा पत्नी आणि मुली पुनःपुन्हा तीर्थक्षेत्रींच जातोय; म्हणून अप्रसन्नता व्यक्त करत असत; पण त्यांना साधनेचे महत्त्व पटल्यावर त्यांनी कधीच गार्हाणे केले नाही.
सर्वकाही सच्चिदानंद परब्रह्म परम पूज्यांच्या कृपेमुळेच घडले.’
२. सौ. आरती दीपक छत्रे (कु. अवनी आणि कु. सुरभी यांची आई), रायंगिणी, बांदोडा, गोवा.
‘आमच्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर मला सत्सेवेला जाणे कठीण झाले. माझ्या यजमानांचे म्हणणे होते, ‘माझी नोकरी आणि उरलेल्या वेळेत सेवा यांमुळे मी घरी अल्प काळ असतो. घर सांभाळून मुलींचा अभ्यास घेणे आणि त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणे, या गोष्टी तुलाच कराव्या लागतील. ‘मला साधनेसाठी साहाय्य करणे’, हे गुरुचरणांची सेवा केल्यासारखे आहे.’ या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी घर सांभाळत माझ्या परीने मुलींवर साधनेचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला.
१. प्रतिदिन सायंकाळी तुळस आणि देवासमोर दिवे लावल्यावर मी मुलींना समवेत घेऊन आरती करत असे. मी त्यांच्याकडून स्तोत्रे पाठ करून घेतली, तसेच मी त्यांच्याकडून नामजप आणि प्रार्थना करवून घेत असे.
२. मी मुलींना वेळोवेळी देवतांच्या गोष्टी सांगितल्या.
३. मुली मोठ्या झाल्यावर मी त्यांना सातत्याने नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करत असे.
४. मुलींच्या बालवयात मी त्यांना अधूनमधून सुखसागर, फोंडा आणि रामनाथी येथील सनातनच्या आश्रमांत घेऊन जात असे.
५. मी मुलींना ‘साधना, तसेच राष्ट्र-धर्म’ या विषयांवरील प्रवचनांना घेऊन जायचे.
६. ‘इतरांचे अनुकरण करून अपशब्द बोलणे किंवा शिव्या देणे चुकीचे आहे’, असे मी मुलींना त्यांच्या बालपणी समजावून सांिगतले.
‘आमच्या दोन्ही मुली आज साधना करत आहेत’, ही सच्चिदानंद परब्रह्म परम पूज्यांचीच कृपा आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २२.१०.२०२४)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/851588.html