कार्तिकी वारी जवळ येत असतांना इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रदूषणाच्या विळख्यात !

दायित्वशून्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन !

ऐन दीपावलीत फेसाळलेली इंद्रायणी नदी

आळंदी (पुणे) – लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत आणि कार्तिक वारी जवळ येत असतांना (१२ नोव्हेंबर) मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे. नदीत विविध कारखान्यांचे पाणी सोडल्याने नदीवर मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला आहे. या फेसाचा पूर्ण तवंग नदीच्या सर्व पात्रात पसरला आहे. गतवर्षीही ऐन दीपावलीत आणि कार्तिकी वारी जवळ येत असतांना हाच प्रकार झाला आहे. यानंतर वर्षभर नदी स्वच्छतेच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या; मात्र त्यावर कोणतीच ठोस उपाययोजना निघालेली नसून प्रशासनाच्या अनास्थेमुळे वारकर्‍यांच्या भावना संतप्त आहेत. (प्रशासनाच्या लेखी वारकर्‍यांच्या भावनांची किंमत शून्य आहे का ? तसेच एरव्ही हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची ओरड करणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ? – संपादक)

या नदीचे पाणी पवित्र समजले जाते आणि त्यात वारकरी स्नान करतात, तसेच तीर्थ म्हणूनही प्राशन करतात. त्यामुळे येणार्‍या कार्तिकीला वारकर्‍यांना यात स्नान कसे करायचे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने तात्काळ प्रदूषण दूर करावे ! – ह.भ.प. संजय महाराज कावळे, अध्यक्ष, आध्यात्मिक गुरुकुल संघ

अनेक वार्‍यांमध्ये नदीच्या पाण्यात सुधारणा होत नसल्याने वारकर्‍यांना या प्रदूषित पाण्यातच स्नान करावे लागते. वारकर्‍यांना येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने ते विकत घ्यावे लागते. तरी कार्तिक वारी जवळ येत असल्याने प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून नदी स्वच्छ करावी.

संपादकीय भूमिका

पर्यावरणप्रेमी वारीच्या वेळी होणारे जलप्रदूषण थांबवण्याविषयी कधीही आवाज का उठवत नाहीत ?