अनीतीमानतेची परिसीमा !
नवी मुंबई – सानपाडा येथे मित्राच्या स्कुटीला धडक दिल्याचा राग अनावर झाल्याने ५ ते ६ जणांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवी मुंबईत सानपाडा येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सानपाडा सेक्टर १ येथे काही मित्र ‘किचन डिलाइट’ हॉटेलजवळील रस्त्यावर जमले होते. यातील आयुष यांच्या गाडीला एका अनोळखी स्कुटी चालकाने धडक दिली. यावरून वाद पेटला. त्यानंतर स्कुटी चालकाने त्याचा मित्र आणि यातील आरोपी दिग्विजय शेळके याला कळवले. शेळके याने थेट स्कार्पिओ घेऊन आला आणि त्याच्या मित्राशी वाद घालणार्या त्या ५ जणांच्या अंगावरून गाडी घातली.
गाडी वेगात येत असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी जीव वाचवण्यासाठी आटापिटा केला. तरीही शेळके काही थांबला नाही आणि त्याने पुन्हा गाडी त्यांच्या अंगावर घालून दामटवली अन् शिवीगाळ करून धमकी दिली. पीडित सुदैवाने बचावले. त्यांनी तक्रार केल्यावर शेळके याने उलट तक्रार प्रविष्ट केली.