‘अभिव्यक्ती’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून चापेकर बंधूंच्या बलीदानाला जातीय रंग देण्याचा अश्लाघ्य प्रयत्न
श्री. नीलेश देशमुख
मुंबई – दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तीनही चापेकर बंधूंच्या हौतात्म्याविषयी शंका उपस्थित करून आणि दामोदर चापेकर यांनी फाशी जाण्यापूर्वी लिहिलेल्या आत्मवृत्तातील निवडक भाग वाचून चापेकरांनी देशासाठी नव्हे, तर धर्मासाठी रँड याची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप ‘अभिव्यक्ती’ या यू ट्यूब वाहिनीवरून मुलाखत घेणारे रवींद्र पोखरकर यांनी केला आहे, तसेच या वेळी लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ हा लेखही देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहिलेला नसून रँडच्या अत्याचारांमुळे धार्मिक बंधने लादल्याने लिहिला असल्याचे सांगून अकलेचे तारे तोडले आहेत.
राजू परुळेकर ‘अभिव्यक्ती’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘‘चापेकर बंधू हे देशभक्त नव्हते, प्लेगच्या काळात देवासमोर गूळ खोबरे वा इतर गोड पदार्थ हे नैवेद्य ठेवले असतांना त्यामुळे उंदीर घरात जाऊ नये म्हणून रँड या अधिकार्याने देव्हारे बाहेर काढायला लावले. याचा राग धरून केवळ धर्मावर बंधने आणली म्हणून त्याचा चापेकरांनी खून केल्याचे सांगितले.’’
|
जातीयवादाला खतपाणी घालून खरा इतिहास सोयीनुसार विसरणारे तथाकथित पुरोगामी !खरेतर पुण्यात प्लेगचा उद्रेक झाला. शासनाने पुण्यात प्लेगचा कायदा केला तोही इंग्रजांच्या व्यापारावर परिमाण होऊ लागला म्हणून. भारतीय जनतेच्या भल्यासाठी नाही. या ‘प्लेग’च्या काळामध्ये माणसे तात्काळ मरू लागली. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी इंग्रज सरकारने रँड नावाच्या अधिकार्याची नियुक्ती केली आणि पुणेकर आगीतून फुफाट्यात सापडले. या अधिकार्याचे शिपाई वेळीअवेळी पुणेकरांचे दरवाजे ठोठावू लागले. बूट घालून देवघरात, स्वयंपाकघरात जाऊन लोकांना खेचून बाहेर आणू लागले आणि त्याची पडताळणी करू लागले. या शिपायांनी शारीरिक पडताळणीच्या नावाखाली अनेक महिलांचे विनयभंग केले, त्यांच्यावर अत्याचारही केले. घराबाहेर पुरुषांना निर्वस्त्र करून त्यांची पडताळणी करायला आरंभ केला. अशा विटंबनेपायी अनेक स्त्रियांनी आत्महत्या केल्या, घरातील महाग चीजवस्तू गायब होऊ लागल्या. नागरिकांना बळजोरीने प्लेग छावणीत दाखल करण्यात येऊ लागले. विरोध करणार्या नागरिकांना प्रचंड मारहाण केली जाई. साहजिकच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती; पण ते हतबल झाले होते. आधीच रोगाची भीती आणि त्यात ब्रिटिशांचे हे अत्याचार. म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांनी रँडला धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी शस्त्र मिळवली. ती कशी चालवायची याचा सराव केला. ते रँडच्या मागावर राहिले आणि अखेरीस २२ जून १८९७ या दिवशी पुण्यात गणेशखिंड परिसरात त्यांनी त्याला आणि आणखी एका अधिकार्याला गोळ्या घातल्या. |