आज ‘भाऊबीज’ आहे. त्या निमित्ताने…
कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती भाऊबीज ! हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस. ‘आपला भाऊ कर्तृत्वान व्हावा’, अशी कामना करून बहीण भावाला ओवाळते आणि त्याला गोड खाऊ घालते. भाऊही तिला एखादी वस्तू ओवाळणी म्हणून देतो आणि तिचा सन्मान करतो. कर्नाटकामध्ये भाऊबीजेचा दुसरा दिवस हा ‘अक्कन तीज’ म्हणून साजरा केला जातो. अक्कन म्हणजे बहिणीचा दिवस म्हणून भाऊबीजेसारखाच हा दिवसही साजरा करतात. भाऊबीजेच्या या दिवसाला ‘यमद्वितीया’, असेही म्हणतात.
विवस्वत आणि सरण्यू यांना यम अन् यमी अशी २ मुले होती. यम ही मृत्यूची देवता आहे. यमदूत त्याचे सेवक असून त्याच्या दाराशी दोन कुत्रे आहेत. यम हा सर्वांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवतो आणि मृत्यूनंतर ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे योग्य ते फळ देतो. असा हा यम आपली बहीण ‘यमी’ हिच्या घरी तिला भेटायला गेला. तिने घरभर लावलेले दिवे पाहून यम प्रसन्न झाला. यमीने त्याला ओवाळून त्याचे स्वागत केले, तेव्हा यमाने तिला ओवाळणी म्हणून वस्त्रालंकार दिले. तेव्हापासून बहीण-भावाच्या नात्याचा हा दिवस सर्वत्र साजरा होऊ लागला. यमद्वितीयेस निधन पावलेल्या व्यक्तीस मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते; पण यमराज मोक्ष देत नाहीत, तर मोक्ष देणार्या परमेश्वराची भक्ती कशी करावी ? तसेच सन्नीती, सदाचार आणि सद़्विचार कसे जोपासावेत ? याचे ज्ञान देतात.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
(साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)