|
दोडामार्ग – शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्या युवकाच्या पाठीवर वळही उमटले, असा आरोप अन्य युवकांनी केला. अस्वस्थ झालेल्या युवकाला अधिक उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. याविषयी माहिती मिळाल्यानंतर संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक ओतारी यांना जाब विचारला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
३० ऑक्टोबरच्या रात्री नरकासुराची प्रतिमा दहन करण्यासाठी आणण्यात आली होती. या वेळी शहराला लागून असलेल्या साळ पुनर्वसन येथील काही युवक बाजारपेठेत रात्री शीतपेय आणण्यासाठी गेले. तेथे रस्त्याच्या बाजूला वाहन उभे करून ते उभे असतांना पोलीस निरीक्षक ओतारी तेथे आले आणि त्यांनी ‘हुल्लडबाजी का करता ?’, असे खडसावून युवकांच्या वाहनाची चावी काढून घेतली. यावर युवकांनी आक्षेप घेतल्यानंतर ओतारी यांनी एका युवकाच्या थोबाडीत मारली. या घटनेचे चित्रीकरण (व्हिडिओ) करत असल्याचे समजल्यावर रागावलेल्या ओतारी यांनी भ्रमणभाष काढून घेतला आणि पोलीस ठाण्यात नेले. या प्रकारामुळे एका युवकाची प्रकृती बिघडली, असा आरोप युवकांनी केला.
याची माहिती मिळताच सर्वपक्षीय नेते युवकावर प्राथमिक उपचार करण्यात आलेल्या दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जमा झाले आणि ओतारी यांना चांगलेच खडसावले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले दोडामार्गमध्ये दाखल झाले. त्यांच्या समोर नागरिकांनी ओतारी यांच्या कारभाराचा पाढा वाचला. ओतारी यांनी मात्र युवकांनी केलेले आरोप फेटाळले. ‘युवक सांगितलेले ऐकत नव्हते म्हणून एकाच्या थोबाडीत मारले आणि संचित गवस, ऋतुराज नाईक, आदेश नाईक आणि ऋतिक गवस या चौघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला’, असे ओतारी यांनी स्पष्ट केले.
नाहक त्रास देणार्या पोलिसांना योग्य ती समज द्यावी ! – राजेंद्र म्हापसेकर
दोडामार्ग – गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील जनता प्रतिदिन कामानिमित्त गोव्यात ये-जा करत असते, तसेच गोव्यातील सीमावर्ती परिसरातील ग्रामस्थ दोडामार्ग शहरात खरेदीसाठी येत असतात; मात्र दोडामार्ग पोलिसांकडून त्यांना नाहक त्रास दिला जातो. गोव्यातील काही युवकांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली ती योग्य नाही. अशा प्रकारे जर पोलिसांनी उद्दामपणा चालू ठेवला, तर येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी योग्य ती समज द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली आहे.
ओतारी यांचे स्थानांतर न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी
दोडामार्ग – पोलीस निरीक्षक ओतारी यांच्या उर्मटपणाचा अनुभव येथील जनतेला आला आहे. बाजारपेठेत थांबलेल्या तरुणांना नाहक मारहाण करून त्यांनी टोक गाठले आहे. पोलिसांची प्रतिमा त्यांनी धुळीस मिळवली आहे. त्यामुळे ओतारी यांचे येथून तात्काळ स्थानांतर करावे अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि जनतेला आंदोलन करावे लागले, अशी चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिली आहे.