‘शिक्षण म्हणजे काय ?’ याचा ऊहापोह स्वामी विवेकानंद यांनी फार सुरेख प्रकारे केलेला आहे. ‘What is education ? – Man making, Character forming and Nation building’ (शिक्षण म्हणजे काय ? – मानवनिर्मिती, चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती !), अशी ते व्याख्या करतात. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे माणूस बनवणे, हा आहे. माणूस म्हणून जन्माला येणे आणि खात्रीशीरपणे माणूस म्हणून जगणे, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. आजूबाजूला बर्याचदा आपल्याला पाशवी प्रवृत्तीचा संचार अगदी सहजपणे दिसतो. माणसांच्या गर्दीत माणूस शोधतांना पुरेवाट होते. विकृतीचे संस्कृतीवर होणारे आक्रमण नाईलाजाने पहावे लागते. ‘दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती’, असा सुविचार रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सुसंस्काराचे रोपण करावे लागते. माणूस बनण्यासाठी हे सर्व जिद्दीने, नेटाने करावे लागते.
१. सुसंस्कार करण्यासाठी पावसमध्ये (जिल्हा रत्नागिरी) वेगळ्या पद्धतीने शालेय शिक्षण
संस्कार म्हणजे नेमके काय, याचा विचार करतांना लक्षात येते की, कर्तव्याचा विचार आणि शिस्तीचा पुरस्कार, म्हणजे सुसंस्कार होय. उत्तम नीतीमूल्ये अंगी बाणण्यासाठी शिक्षण कटीबद्ध असते; कारण यामधूनच चारित्र्य घडते आणि राष्ट्राची उभारणी होण्यास साहाय्य होते. दूरदृष्टी लाभलेल्या योगीराज प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी याच हेतूने शाळा काढली. हे विद्यालय राष्ट्रीय शिक्षण देणारे असल्यामुळे स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, समाजसेवा अशा अनेक मूल्यांना जसे प्रधान महत्त्व, तसेच चरख्यावर सूत काढणे, स्वदेशी वस्तूंचा अंगीकार अशी तत्त्वे निश्चित करून आणि भावी काळातील सक्षम समर्थ स्वतंत्र भारत निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पावसमध्ये शालेय शिक्षणाची पायाभरणी केली गेली.
२. शिक्षणाचा उद्देश आणि खरा शिक्षक कोण ?
‘माणसाने साक्षर पर्यायाने सुशिक्षित होणे एवढाच मर्यादित उद्देश शिक्षणाचा नसतो, तर माणूस सुसंस्कृत व्हावा’, हा महत्त्वाचा हेतू असतो. ज्ञान, कर्म आणि शील या मुशीतून अर्थात् सुसंस्कारातून जीवन उजळत असते. तेजाच्या स्पर्शाने अंधार दूर होतो, वृक्षाला मुळांचा आधार असतो, शिल्पास शिल्पकार आकार देतो, तसे मुलांना आईवडील आणि गुरुजन घडवत असतात. आजच्या युगात ‘शिक्षक’ हा घटक शाळा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. शिस्त-क्षमता-कर्तव्य यांचा समुच्चय, म्हणजे खरा शिक्षक होय. याच अनुषंगाने प.पू. स्वामी स्वरूपानंद यांची पालक आणि शिक्षक यांना बोधामृत देणारी, अशी तीनही पत्रे आहेत.
३. नवीन शैक्षणिक धोरण आणि प.पू. स्वामी स्वरूपानंद यांची दूरदृष्टी
आधुनिक म्हटले, तरीसुद्धा त्यामध्ये नव्या गोष्टींमध्येही जुनी पाळेमुळे दडलेली असतात. त्याप्रमाणे नवीन ‘शैक्षणिक धोरण २०२०’ या कस्तुरीरंगन समितीच्या आराखड्यात जुन्या नव्याचा संगम दिसतो. ‘घोका आणि ओका’, या जुन्या पद्धतीतील धोके जाणून ज्ञानापेक्षा आकलनावर, पाठांतरापेक्षा कृतीशीलतेवर भर देणे, रोजगाराभिमुख, म्हणजे कौशल्य विकसनाचा कृतीशीलतेचा खोलात जाऊन विचार करणे आणि यासह विद्यार्थ्यांचा खर्या अर्थाने बोधात्मक, क्रियात्मक अन् भावनात्मक असा सर्वांगीण विकास साधावा, अशी निश्चित उद्दिष्टे नवीन धोरणात दिसतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करतांना स्पष्ट होते की, प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी शिक्षणाचा अचूक विचार केला होता. सखोल चिंतन, मनन करून शाळेची स्थापना केली, ती ‘स्वामी स्वरूपानंद प्रशाला’ या नावाने आजही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. उद्याचा उज्वल भारत घडवण्यासाठी स्वामींचे तत्त्वज्ञान शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शक होवो, अशी विठ्ठलचरणी मनोभावे प्रार्थना !’
– सौ. सुचरिता चंद्रशेखर पोरे, पुणे
(साभार : मासिक ‘श्रीक्षेत्र पावस’, १५.१२.२०२३)