‘माझा भाऊ श्री. श्रीरंग कुलकर्णी (वय ४९ वर्षे) सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. आमच्या आई-वडिलांचे बर्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. श्रीरंग अपंग असल्याने आणि त्याची मुंज झालेली नसल्याने त्याला आई-वडिलांचे श्राद्धविधी करता येत नाहीत. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आल्यानुसार आम्ही प्रत्येक वर्षी वडिलांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी आश्रमात धन स्वरूपात अर्पण करतो. या वर्षीही २२.९.२०२४ या दिवशी वडिलांची मृत्यूची तिथी होती. त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. वडिलांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांना पितरांना गती मिळण्यासाठी प्रार्थना करणे
२२.९.२०२४ या दिवशी मी श्रीरंगला घेऊन प.पू. भक्तराज महाराजांच्या चित्राजवळ प्रार्थना केली. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) त्या वेळी माझ्याकडून पुढील प्रार्थना करून घेतली – ‘हे गुरुदेवा, आपणच साक्षात् दत्तगुरु आहात. सर्वांना मोक्षाला नेणारे, सर्वांचा उद्धार करणारे आपणच आहात. पितरांचे श्राद्ध करून त्यांना गती देण्यास आम्ही असमर्थ आहोत; पण आपण सर्व जिवांचा उद्धार करता. आपणच आमच्या सर्व पितरांना योग्य ती गती द्या. त्या सर्वांना साधना करण्याची बुद्धी देऊन, आपल्या धर्मकार्यात त्यांना सहभागी करून घेऊन त्यांचा उद्धार करावा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ‘पूर्वजांच्या त्रासामुळे येणारे आमच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होऊन आम्हाला आपली चरणसेवा समर्पितभावाने करता येऊ दे. पूर्वजांच्या त्रासापासून आमचे रक्षण होऊ दे.’ ही प्रार्थना करून श्रीरंगने अर्पणपेटीमध्ये धन अर्पण केले.
२. काही प्रमाणात मतीमंदत्व आणि अपंगत्व असूनही श्री. श्रीरंग यांना पुष्कळ हलकेपणा जाणवणे
दुसर्या दिवशी श्रीरंगला पुष्कळ हलकेपणा जाणवला. वास्तविक अपंगत्व आणि काही प्रमाणात मतीमंदत्व असल्याने हे त्याच्या स्थितीला कळणे पुष्कळ अवघड आहे; परंतु परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेने त्याला हा हलकेपणा अनुभवता आला.
गुरुदेवांनी शास्त्रानुसार कृती करण्याचे महत्त्व आणि हिंदु धर्माची महानता लक्षात आणून दिली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे (वय ५७ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (१.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |