प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : केन् स्वित् द्वितीयवान् भवति ?
अर्थ : कुणीतरी साहाय्यक आहे, असे कुणामुळे घडते ?
उत्तर : धृत्या।
अर्थ : धैर्यामुळे मनुष्य साहाय्यवान होतो.
पंतप्रधानांसारख्या श्रेष्ठ पदावरील व्यक्तीची हत्या (काँग्रेस नेत्या आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) त्यांच्या अंगरक्षकानेच केली, हे आपणास ठाऊक आहे. यासाठीच युधिष्ठिर उत्तर देतो की, धृति म्हणजेच धैर्य, हाच माणसाचा खरा साहाय्यक आहे.
अंतःकरणात धैर्य असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहून संकटाला विश्वासाने तोंड देऊ शकतो. दुसरा कुणी साहाय्यक असला, तर ठीक आहे; पण ‘कुणी साहाय्यक नाही’, या कल्पनेने हा धैर्यवान पुरुष कधीही लटपटत नाही. मेघवर्षाव कितीही मोठ्या प्रमाणात झाला, तरी पर्वताचे शिखर डळमळत नाही, तसेच हे होते. अनेक क्रांतीकारक देशभक्त फाशी देण्याच्या पटलावर निर्भयपणे उभे राहिले. त्यांच्या मुद्रेवर हास्य होते आणि प्रसन्नता होती. जणू मुक्ती नवरीला वरण्यासाठी वर म्हणून ते बोहल्यावर उभे होते. इंग्रज अधिकारीही धैर्याच्या निर्भयतेच्या या दर्शनाने आश्चर्यचकित झाल्याची वर्णने आहेत. अंतःकरणात धैर्यच नसले, तर हातात शस्त्र असून त्याचा उपयोग काय ? पिस्तुल जवळ असले, तरी ते रोखण्याचे भान राहिले पाहिजे ना ? क्वचित् रोखले गेले आणि त्या वेळी हात थरथरू लागला, तरी पिस्तुल निरुपयोगीच ठरले कि नाही ? भर्तुहरीनेही सत्पुरुष निर्भय का राहू शकतो ?, याची कारणे सांगतांना ‘धैर्य हे त्याचे पित्यासारखे संरक्षण करते’, असे म्हटले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)