श्री धन्वन्तरिदेवाय नमः।

दीपावली विशेष !

प्राचीन काळापासून आश्विन कृष्ण त्रयोदशीला, म्हणजेच धनत्रयोदशीला ‘धन्वन्तरि जयंती’ साजरी करतात. २८ ऑक्टोबरला धन्वन्तरि जयंती झाली. इंद्र जेव्हा सुर आणि असुर यांना घेऊन सागरमंथन करत होते, तेव्हा १४ रत्ने बाहेर पडली. त्यांपैकी एक म्हणजे विष्णूचे अवतार देव धन्वन्तरि ! धन्वन्तरि अमृत घेऊन आले होते. धन्वन्तरि हे वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो. त्यांच्या कृपेमुळे देवांना वेगवेगळ्या औषधी मिळाल्यामुळे त्यांना ‘देवांचा वैद्य’ म्हणून ओळखले जाते.

धन्वन्तरि यांना आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले आहे. त्यामुळेच आयुर्वेद हे परिपूर्ण शास्त्र आहे. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद, आयुष्याचे ज्ञान ! आयुर्वेद हा पाचवा वेद असून तो मानवासाठी निर्मिला गेला. प्राचीन ऋषिमुनींनी रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी आयुर्वेद लिहिलेला आहे. यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व आयुर्वेदाच्या औषधांमध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे त्या काळी लिहिलेली आयुर्वेदातील प्रत्येक गोष्ट आताही तंतोतंत लागू होते. आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतामध्ये कोणतेही पालट झालेले नाहीत किंवा नवीन संशोधनही होत नाही. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, ऋतुमानानुसार दिनचर्या कशी असायला हवी, हे सांगितल्यामुळे त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला होतो. आयुर्वेदामध्ये सर्वांसाठी एकच नियम नाही. आयुर्वेदामधील कोणतेही सूत्र आहे तसे लागू केले, तर त्याचे परिणाम आताही तसेच जाणवतात, असा आताच्या वैद्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आयुर्वेदावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे कृती केल्यास आपल्याला परिणाम हा जाणवणारच आहे.

इंग्रजांच्या राजवटीनंतर आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारतात सरकारकडून आयुर्वेद बाजूला ठेवला गेला. त्यामुळे भारतियांसह अखिल मानवजातीची अपरिमित हानी झाली; परंतु काही वैद्यांनी आयुर्वेदानुसार रुग्णांवर उपचार करून आयुर्वेद जिवंत ठेवलेला आहे; किंबहुना त्याचा प्रसार जगभर कसा होईल, हेही पाहिले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर आयुर्वेदाची महती जगभर झाली. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाची सूत्रे आचरल्यास आपल्यावर श्री धन्वन्तरि देवतेची कृपा होऊन स्वतःचे आरोग्य निरोगी रहाणार आहे. श्री धन्वन्तरि देवतेला प्रार्थना करून औषध सेवन केल्यास त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होईल. अशा श्री धन्वन्तरि देवतेच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच !

त्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग आणि आचरण स्वतःपासून करून त्याचा जगभर प्रसार करण्याचा संकल्प या धन्वन्तरि जयंतीच्या निमित्ताने करूया !

– वैद्या (सुश्री) कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.