सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी विविध नामधुनी सिद्ध करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना श्रीविष्णूच्या नामधुनीची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे यातील काही भाग आपण २८ ऑक्टोबर या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/848918.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. विष्णु-लक्ष्मीची धून सुचण्याविषयी आलेल्या अनुभूती 

५ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘श्रीविष्णूच्या नामधुनींच्या समवेत लक्ष्मीचीही एखादी नामधून हवी’, असे सांगितल्यावर त्यांच्या संकल्पाने लक्ष्मीची नामधून सुचणे : ‘आम्ही श्रीविष्णु आणि श्रीकृष्ण यांच्या काही नामधुनी बसवून त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नारायणाच्या समवेत नेहमी लक्ष्मी असते; म्हणून लक्ष्मीचीही धून बसवल्यास चांगले होईल.’’ त्यानंतर रात्री आम्ही खोलीत आल्यावर अकस्मात् देवाने मला ‘लक्ष्मी-विष्णवे नमो नमः। विष्णुपत्न्यै नमो नमः। आदिशक्त्यै नमो नमः । नारायण्यै नमो नमः ।’ या चार ओळी मला चालीसहित सुचवल्या. आम्ही ती नामधून ध्वनीमुद्रित करून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवली. दोघींनाही लक्ष्मीची नामधून पुष्कळच आवडली. जणू या दोघी देवी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ) त्यांची स्तुती ऐकून आनंदी झाल्या’, असे मला जाणवले.

५ आ. देवीची नामधून सुचल्यावर सूक्ष्मातून तिन्ही गुरूंचे दर्शन होणे : मला देवीची नामधून सुचल्यानंतर सूक्ष्मातून ‘श्रीविष्णुरूपात सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), त्यांच्या एका बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि दुसर्‍या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ’, असे दृश्य दिसले. यावरून त्या दोघींच्या संकल्पाने मला वरील नामधून सुचली’, असे जाणवले.’

– सौ. अनघा जोशी

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

५ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘लक्ष्मीदेवीच्या नामधूनमध्ये श्रीविष्णूचीही एक नामधून घाला’, असे सांगणे : ‘देवीची सुचलेली नामधून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘लक्ष्मीदेवीच्या या नामधूनीमध्ये श्रीविष्णूचीही एक नामधून घाला.’’ त्यानंतर मला श्रीविष्णूची नामधून सुचली, ‘अच्युताय नमो नमः । जनार्दनाय नमो नमः । लक्ष्मीकान्ताय नमो नमः । नारायणाय नमो नमः ।’ अशा प्रकारे श्री लक्ष्मी-विष्णूची एक नवीनच नामधून सिद्ध झाली.

५ ई. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींना ही नामधून ऐकवल्यावर त्यांनी त्यात एकही सुधारणा न सांगता एकदम तृप्ततेने आणि आनंदाने ‘अप्रतिम !’, असे उद्गार काढले.

५ उ. या नामधुनीविषयी तिन्ही गुरूंनी दिलेल्या प्रतिसादावरून मला त्यांच्यातील एकरूपता लक्षात आली, तसेच तिन्ही गुरूंच्या चरणांपर्यंत ही नामधून पोचली’, असे जाणवले.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

सौ. अनघा जोशी

६. श्रीरामाच्या नामधूनीविषयी आलेली अनुभूती 

६ अ. नामधून गातांना तिच्या उच्चारणामुळे ‘नामधून मानसिक स्तराची जाणवते’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे : ‘आम्ही श्रीरामाची एक प्रचलित नामधून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘ही नामधून ऐकतांना मानसिक स्तराची जाणवते. यातील ‘राम’ या शब्दाचा एका पाठोपाठ होत असलेला उच्चार ऐकतांना ‘मरा मरा’, असे अधिक ऐकायला येते; म्हणून ही नामधून नको.’’

६ आ. नामधुनीचे गायनातील उच्चारण ‘तिला मानसिक स्तरावर कसे नेते ?’, हे शिकता येणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे हे बोलणे ऐकल्यावर ‘कुठल्या शब्दांमुळे भाव जाणवतो ?’ हा अभ्यास करायला हवा’, हे आमच्या लक्षात आले. या नामधुनीमध्ये देवाचे नाव असले, तरी ‘त्याचे गायनातील उच्चारण त्याला मानसिक स्तरावर कसे नेते ?’, हा पैलूही आम्हाला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकता आला. त्यामुळे ही नामधून रहित झाली.

६ इ. देवाला प्रार्थना केल्यावर श्रीरामाची नवीन नामधून सुचणे : ‘श्रीरामाची दुसरी नवीन नामधून कुठली घ्यावी ?’, असा आम्ही विचार करत होतो. त्यासाठी आम्ही देवालाच प्रार्थना केली, ‘ही नामधून तूच सुचव.’ तेव्हा आम्हाला ‘श्रीराम जय राम जय जय राम, जय रघुनंदन जय सीयाराम’ ही नवीन नामधून सुचली. ही नामधून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवल्यावर त्यांनाही ती पुष्कळ आवडली.

७. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या नामधूनीच्या संदर्भात आलेली अनुभूती

७ अ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ही नामधून म्हणतांना आमचा दोघींचा आवाज एकसारखा लागला आणि एकाच प्रयत्नात त्याचे ध्वनीमुद्रण चांगले होऊन ती अंतिमही झाली.

७ आ. ही नामधून म्हणतांना आम्हाला ध्यानात गेल्यासारखे होऊन जागृत ध्यान अनुभवता आले.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी

७ इ. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी सरावाच्या वेळी रथ पटांगणाच्या मध्याकडे यायला निघतांनाची स्पंदने, प्रत्यक्ष रथाची स्पंदने आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या नामधुनीची स्पंदने यांची एकरूपता अनुभवणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी रथोत्सवात चालणार्‍या साधकांचा पटांगणात सराव चालू होता. परिक्रमा संपवून रथ पटांगणाच्या मध्यावरील व्यासपिठाकडे येतांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ ही नामधून निवडली होती. प्रत्यक्ष सरावाच्या वेळी ही नामधून लावल्यावर रथात कुणीही बसलेले नसतांनाही ‘या रथातून साक्षात् त्रैलोक्यनाथ, साक्षात् भगवान श्रीकृष्णच येत आहे’, असे जाणवून त्या रथाकडे पाहून माझी भावजागृती झाली. रथ पटांगणाच्या मध्याकडे यायला निघतांनाची स्पंदने, प्रत्यक्ष रथाची स्पंदने आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामधुनीची स्पंदने यांच्यात एकरूपता आली आहे’, असे मला अनुभवता आले.

(क्रमश:)

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849471.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक