‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना श्रीविष्णूच्या नामधूनविषयी सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे यातील काही भाग आपण २९ ऑक्टोबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849110.html
७. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या नामधूनच्या संदर्भात आलेली अनुभूती
७ ई. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ही नामधून ऐकतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींच्याही अंगावर रोमांच येऊन त्यांची भागजागृती होणे : सरावाच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघीही उपस्थित होत्या. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ही नामधून लागल्यावर त्या दोघी म्हणाल्या, ‘‘अंगावर रोमांच आले.’’ श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘ही नामधून ऐकतांना भावजागृती होत आहे’’, तर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘यात पुष्कळ प्रमाणात आर्त भाव जाणवतो.’’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर
७ उ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ही नामधून ध्वनीमुद्रित करतांना भावजागृती होऊन अंतर्मुखता वाढणे आणि ही नामधून पुन:पुन्हा ऐकावी’, असे वाटणे : ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ ही नामधून ध्वनीमुद्रित करतांना पुष्कळ भावजागृती होत होती. ‘ती नामधून ध्वनीमुद्रित करण्याच्या वेळी तबलावादन करतांना माझे शरीर डोलत आहे’, असे मला वाटत होते. एरव्ही बाहेरची भजने ऐकतांना माझे मन बहिर्मुख रहाते; पण ही नामधून ध्वनीमुद्रित करतांना आणि ऐकतांना ‘मी अंतर्मुख होत आहे’, असे मला जाणवले. मला ‘ही नामधून पुनःपुन्हा ऐकावी’, असे वाटत होते.
७ ऊ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या नामधूनच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळी तबल्याची साथ देतांना ‘ही नामधून ऐकणार्यांची भावजागृती व्हायला हवी’, अशा प्रकारे तबला योग्य आणि सौम्य आवाजात वाजवला पाहिजे’, असे वाटणे : ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामधूनच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळी तबल्याची साथ करतांना देवाने माझ्या मनात विचार दिला, ‘या नामधूनसाठी ठेका चांगला लागला पाहिजे. ऐकणार्यांचे लक्ष तबल्याच्या ठेक्याकडे न जाता नामधूनमधील शब्दांकडे जाऊन त्यांची भावजागृती व्हायला पाहिजे.’ यासाठी मी देवाला प्रार्थना केल्यावर या नामधूनला एक चांगला भजनी ठेका आपोआपच वाजवू लागलो.’
– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
८. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांनी सिद्ध केलेल्या नामधून पुनःपुन्हा ऐकूया’, असे वाटणे
अन्य भजने ऐकतांना ‘ती फार वेळ ऐकावी’, असे वाटत नाही; पण (इथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात) ज्या नामधून सिद्ध केल्या आहेत, त्या पुनःपुन्हा ऐकूया’, असे वाटते. त्या ऐकल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे किंवा ईश्वराचे स्मरण होते.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, सौ. अनघा जोशी आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘गाणे तुमच्याच आवाजात का नाही ?’, असे विचारणे
आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना या सगळ्या नामधून ऐकवल्या आणि या कार्यक्रमप्रसंगी आम्ही गायनासाठी निवडलेले ‘आत्मा रामा आनंद रमणा…’ हे गीत ऐकवले. तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘हे गीत तुमच्या आवाजात का नाही ? साधकांनी म्हटलेले गाणे ऐकतांना अधिक चांगले वाटते.’’ तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आम्ही कार्यक्रमाच्या वेळी कुठले गीत म्हणायचे आहे ?’, हे समजण्यासाठी हे गीत आणले आहे.’’ तेव्हा ते ‘‘बरं’’ म्हणाले.
१०. आवाजात आपोआप दैवी गोडवा येणे
१० अ. ब्रह्मोत्सवासाठी नामधून बसवण्याची सेवा चालू झाल्यावर आवाजात दैवी गोडवा जाणवणे अन् ब्रम्होत्सव झाल्यावर आवाज पूर्ववत् झाल्याचे जाणवणे : ब्रह्मोत्सवासाठी नामधून सिद्ध करण्याची सेवा चालू झाल्यावर माझ्या आवाजात आपोआप वेगळाच दैवी गोडवा जाणवायला लागला. (एरव्ही माझ्या आवाजात फारसा गोडवा नसतो.) नामधून गातांना मला माझा आवाज ‘माझा’ वाटतच नव्हता. जणू एक दैवी शक्ती माझ्या आवाजात आली आहे’, असे मला जाणवत होते. ब्रह्मोत्सव संपल्यावर मला माझा आवाज पूर्ववत् झाला असून तो दैवी गोडवा गेला’, असे जाणवले.
१० आ. एरव्ही गायन करतांना माझे खर्जातील (खालचे) स्वर फारसे लागत नाहीत; परंतु या नामधूनच्या सेवेच्या वेळी माझे खर्जातील (खालचे) स्वरही चांगले लागले.’- सौ. अनघा जोशी
११. ‘आत्मारामा आनंद रमणा..’ या गीताच्या शेवटी ‘हरि नारायण गोविंदम्’ हा जयघोष गाणे म्हणणार्या साधिकांना सुचणे
‘आत्मारामा आनंद रमणा..’ या गाण्याच्या शेवटी जयघोष घ्यायचा होता. प्रथम ‘सच्चिदानंद गोविंदम्’, असे आम्ही म्हणून पाहिले; परंतु आम्हाला ‘सच्चिदानंद’ हा शब्द जलद गतीत गातांना कठीण जात होता. त्यामुळे ‘आम्ही सगळ्या जणी (हे गाणे म्हणणार्या साधिका) नारायणाचे कुठले नाव घ्यायचे ?’, असा विचार करत होतो. कुणी म्हणाले, ‘‘हरि’ म्हणूया, कुणी म्हणाले, ‘नारायण’ म्हणूया, तर कुणी म्हणाले, ‘गोविंद’ म्हणूया.’’ तेव्हा आमच्यातील एका साधिकेला ‘हरि नारायण गोविंदम्’, अशी तिन्ही नावे असलेला जयघोष सुचला. देवानेच तिच्या माध्यमातून आम्हाला हा जयघोष सुचवला.’
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेनेच आम्हाला या नामधून सुचल्या आणि त्या त्यांनी आमच्याकडून चांगल्या प्रकारे गाऊन घेतल्या. यासाठी त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता !’ (समाप्त)
– गाणे म्हणणार्या सर्व साधिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |