अनेक देशांच्या नागरिकांचाही समावेश
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत अवैधपणे रहाणार्या भारतीय नागरिकांना परत पाठवण्यासाठी अमेरिकेने चार्टर्ड विमाने भाड्याने घेतली आहेत. ‘होमलँड सिक्युरिटी विभागा’ने सांगितले की, हे भारत सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे. चार्टर विमाने २२ ऑक्टोबर या दिवशी भारतात पाठवण्यात आली. पारपत्र कायद्याची कार्यवाही (अंमलबजावणी) आणि अवैध प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकन सरकारने हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेने कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, इजिप्त, मॉरिटानिया, सेनेगल, उझबेकिस्तान, चीन आणि भारत या देशांसह जगभरातील अनेक देशांमधून लोकांना हद्दपार केले आहे.
‘होमलँड सिक्युरिटी’ने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतासह १४५ हून अधिक देशांमधील १ लाख ६० सहस्रांहून अधिक व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. ज्या भारतीय नागरिकांना अमेरिकेत रहाण्यासाठी कायदेशीर आधार नाही, त्यांना तात्काळ हद्दपारीचा सामना करावा लागेल.