जप्त सोने एका आस्थापनाचा वैध माल असल्याचा दावा !
पुणे – येथे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटी रुपयांचे सोने पकडले गेले आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग, तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. सध्या हा टेंपो पुणे येथील साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आलेला आहे. चौकशीअंती हे सोने अवैध नव्हे, तर एका सोन्याची ने-आण करणार्या आस्थापनाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेले सोने पुढील अन्वेषणासाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपुर्द केले आहे.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी चालू असतांना मुंबईच्या दिशेने एका पांढर्या रंगाचा टेंपो पुणे येथे आला होता. ‘सिक्वेअल कंपनी’चा टेंपो पोलीस पथकाने थांबवून त्याची पडताळणी केली. त्यामध्ये असलेल्या पांढर्या पोत्यांतील बॉक्सविषयी संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याची पहाणी केली असता त्यामध्ये सोने मिळाले.