Yunus Wants Army Chief Ousted : बांगलादेशामध्‍ये सैन्‍यदलप्रमुखांना हटवण्‍याची महंमद युनूस यांची योजना !  

बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांचा दावा

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस देशाच्‍या सैन्‍यातील ६४ वरिष्‍ठ अधिकार्‍यांना काढून टाकण्‍याचा विचार करत आहेत. यांमध्‍ये बांगलादेशाचे सैन्‍यदलप्रमुख वकार-उझ-जमान यांचाही समावेश आहे.

बांगलादेशातून भारतात आश्रय घेतलेल्‍या लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी विश्‍वसनीय सूत्रांच्‍या हवाल्‍याने हा दावा केला आहे. तस्‍लिमा नसरीन यांनी सामाजिक माध्‍यमांतून याविषयीची माहिती दिली आहे.

तस्‍लिमा नसरीन यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍ट करत म्‍हटले की, महंमद युनूस यांनी जमात-ए-इस्‍लामी आणि तिची विद्यार्थी संघटना छात्र शिबीर यांवरील बंदी उठवली; परंतु बांगलादेशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असणार्‍या अवामी लीगची विद्यार्थी शाखा, छत्र लीगवर बंदी घातली. त्‍यांनी ‘हिजबुत-तहरीर’, ‘अन्‍सारुल्ला बांगला टीम’ यांसारख्‍या इतर इस्‍लामी आतंकवादी संघटनांवरही बंदी घातली.

युनूस सरकार बेकायदेशीर !

बांगलादेशाचे राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांच्‍या मुलाखतीचा दाखला देत तस्‍लिमा म्‍हणाल्‍या की, शेख हसीना यांनी त्‍यांच्‍या पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिले नव्‍हते आणि त्‍या अजूनही जिवंत आहेत. त्‍यामुळे महंमद युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन झालेले अंतरिक सरकार बेकायदेशीर आहे. बांगलादेशात प्रत्‍येक जण खोटे बोलत आहे.


बांगलादेशाचे सैन्‍यदलप्रमुख आणि राष्‍ट्रपती यांनी हसीना यांनी त्‍यागपत्र दिल्‍याचे म्‍हटले होते. एवढेच नव्‍हे, तर महंमद युनूसही म्‍हणाले होते की, हसीना यांनी त्‍यागपत्र दिले आहे; मात्र हे त्‍यागपत्र कुणीही पाहिले नाही ! शेख हसीना यांचे त्‍यागपत्र देवाच्‍या अस्‍तित्‍वासारखे आहे.  प्रत्‍येक जण म्‍हणतो देव आहे; पण तो कुठे आहे हे कुणी दाखवू किंवा सिद्ध करू शकत नाही.