खेड-शिवापूर (पुणे) टोलनाका परिसरातून एका चारचाकी गाडीतून ५ कोटी रुपये जप्त !

सरकारची रक्कम असल्याचा संजय राऊत यांचा आरोप !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – खेड-शिवापूर टोलनाका परिसरामध्ये चारचाकी गाडीतून ५ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही रक्कम सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांची असल्याचे सांगितले जाते. राजगड पोलिसांनी ही कारवाई करत ही रक्कम पोलीस ठाण्यात नेली आहे. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. रात्री ८ वाजता ही संशयित गाडी खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ थांबवण्यात आली. पोलिसांनी गाडीचालकाला ही रक्कम कुठे नेण्यात येणार होती ? ती कुणाची आहे ? याविषयी विचारले; पण चौकशीत काहीच माहिती न मिळाल्याने राजगड पोलिसांनी ती रक्कम जप्त केली. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मिंधे सरकारची रक्कम असल्याची टीका ‘ट्वीट’द्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, ‘‘खरेतर ५ ते ६ गाड्या होत्या. त्यामध्ये २५ ते ३० कोटी रुपये होते. त्यातील १ गाडी पकडली गेली. त्यात ५ कोटी रुपये सापडले. उर्वरित गाड्यांतील रकमेचे काय ?’’

शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ‘ट्वीट’ करत ‘ही रक्कम मिंधे (शिंदे) गटाची आहे. मिंधे गट निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी रुपये पाठवत आहे. त्याचा हा पहिला हप्ता आहे’, असा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका :

निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात ! प्रलोभने देऊन मतदान होत असेल, तर लोकशाही कशी टिकणार ?