दादर रेल्वेस्थानकाबाहेर मद्याच्या दुकानापुढे मद्य पिणार्‍यांविरुद्ध सुराज्य अभियानाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

मुंबई – मुंबईतील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर  रस्त्याला लागून असलेल्या ‘भारत वाईन’ या मद्याच्या दुकानाच्या बाहेर पादचारी मार्गावर उभे राहून मद्य पिणार्‍यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राची प्रतिमा, महिलांची सुरक्षा आणि भावी पिढीपुढील आदर्श, यांचा गांभीर्याने विचार करून या प्रकरणी तत्परतेने कारवाई कराल, अशी अपेक्षा आहे. आपण केलेल्या कारवाईविषयी कृपया आम्हाला अवगत करावे’, असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की,

१. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात मद्यपी ‘भारत वाईन’ दुकानाच्या बाहेर उभे राहून मद्य पित असतात.

२. ‘भारत वाईन’ हे केवळ मद्यविक्रीचे दुकान असून याला ‘परमिट रूम’ची अनुमती नाही. त्यामुळे येथे केवळ मद्यविक्रीला अनुमती आहे; पण मद्य पिण्याला नाही. तरीही दुकानाच्या समोर पादचारी मार्गावर उभे राहून मद्यपी मद्य पितात. यामुळे तेथून चालण्यास नागरिकांना अडचण येते.

३. देश-विदेशातून मुंबईत येणारे अनेक प्रवासी दादर येथे उतरतात. त्यांच्यापुढे दिसणारी मुंबईची अशी प्रतिमा अशोभनीय आहे. मुंबईत अशा प्रकारे अनेक मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर उभे राहून मद्यपी मद्य पितात. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

४. हा प्रकार उघडपणे चालू असूनही उत्पादन शुल्क विभाग, मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून हे प्रकार रोखले जात नाहीत, हे खेदजनक आहे. तरी या प्रकरणी तत्परतेने कारवाई व्हावी. जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.

गैरप्रकार वेळीच न रोखणारी यंत्रणा गुन्ह्यांना कारणीभूत ठरेल ! – अभिषेक मुरुकटे, राज्य समन्वयक, सुराज्य अभियान

श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान,

मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी असल्याने येथे चालणार्‍या गोष्टींचे अनुकरण राज्यभरात होते. त्यामुळे असे प्रकार पुणे, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांसह राज्यभरात सर्वत्र पसरण्यास वेळ लागणार नाही. समाजात उघडपणे मद्य पिण्याच्या प्रकारांमुळे भावी पिढीवर कुसंस्कार होण्याचा धोका संभवतो. सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण आणि छेड काढणे, हे प्रकार वाढत आहेत. मद्यपी अशा प्रकारे दुकानांबाहेरच मद्य प्यायला लागले, तर महिलांवरील अत्याचारांचे प्रकार वाढण्याची भीती आहे. हे प्रकार वेळीच न रोखणारी यंत्रणाही घडणार्‍या गुन्ह्यांना कारणीभूत ठरेल, अशी भावना सुराज्य अभियानाचे राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.