(‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्यात गुप्त जाळे निर्माण करणारी आणि जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकणारी विचारधारा.)
भारताचे नायक आणि ‘रॉ’चे माजी अधिकारी विकास यादव यांना ‘मोस्ट वाँटेड’ (पोलिसांना हवी असलेली गुन्हेगार व्यक्ती) ठरवणारी अमेरिकेची ‘सीआयए’ ही गुप्तचर संघटना इतर देशांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी कसे उद्योग करत असते ?, याची एक झलक बघूया.
१. अमेरिका, फोर्ड फाऊंडेशन आणि काँग्रेस यांची ‘भारत जोडो’ यात्रा !
नुकत्याच उघड (डीक्लासिफाय) झालेल्या काही कागदपत्रांमध्ये ‘सीआयए’ म्हणते, ‘ज्या देशांमध्ये आपला ‘इंटरेस्ट’ (हित) आहे, तेथे प्रशिक्षण संस्था चालू कराव्यात आणि त्यासाठी ‘फोर्ड फाऊंडेशन’कडून अर्थसाहाय्य घ्यावे.’ वर्ष १९८२ मध्ये ‘फोर्ड फाऊंडेशन’चे अधिकारी दीप जोशी यांनी ‘प्रदान’ ही अशासकीय संस्था विजय महाजन यांच्यासमवेत चालू केली. त्यांना ‘फोर्ड फाऊंडेशन’कडून कोट्यवधी रुपयांचे साहाय्य झाले. हे विजय महाजन राहुल गांधी यांचे सल्लागार आणि गांधी कुटुंबियांच्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. अमेरिकेच्या ‘प्याद्यां’ची गांधी कुटुंबियांशी विलक्षण जवळीक आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या पूर्वसिद्धतेसाठी हे महाजन महाशय अयोध्येला गेले होते आणि तेथे त्यांनी संत-महंतांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. या महाजनांनी ‘Basix’ (बेसिक्स) नावाची एक कंपनीही काढली होती, जिला अर्थसाहाय्य केले होते अर्थात्च ‘फोर्ड फाऊंडेशन’ने. ये रिश्ता कुछ कहता है ! (हे नाते काहीतरी सांगत आहे.)
२. योगेंद्र यादव यांचे अप्रत्यक्षपणे चिथावणी देणारे विधान !
‘भारत जोडो’ यात्रेचा प्रचार आणि नियोजन यांत विजय महाजन अन् योगेंद्र यादव यांचा पुढाकार होता. याच योगेंद्र यादव यांनी वर्ष २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ‘आता राज्यघटनेचे रक्षण निवडणुकांमधून नाही, तर जनआंदोलनांमधून होणार आहे’, असे वक्तव्य केले होते. ‘डीप स्टेट’ने इतके प्रयत्न करूनही सरकार शेवटी मोदी यांचेच आले, हे पाहिल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी असे कुणाला तरी पुढे करून, अराजक पसरवून बांगलादेशाप्रमाणे सरकार उलथून टाकण्याची योजना या उद्गारांवरून दिसून येते.
३. नदीम खान यांचे भारतविरोधी वक्तव्य !
‘जमात ए इस्लामी हिंद’चे नदीम खान यांनी नुकतेच असे विधान केले, ‘महंमद युनुस यांनी बांगलादेशात जसा सत्तापालट घडवला, तसाच पालट आता भारतातही घडणार आहे.’
४. शेख हसीना यांची सत्ता उलथवण्यामागे ‘फोर्ड फाऊंडेशन ?’
बांगलादेशात ‘डीप स्टेट’ने लोकशाही वाचवण्यासाठी कुठल्याही घटनात्मक प्रक्रियेविना सत्तेत बसवलेले आणि ‘फोर्ड फाऊंडेशन’चे लाडके महंमद युनुस यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध शेख हसीना यांच्या सरकारने कायदेशीर कारवाई चालू केली होती. त्या वेळी महाजन आणि ‘फोर्ड फाऊंडेशन’चे माजी विश्वस्त, तसेच ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती यांनी जाहीर निवेदन प्रसारित करून ‘ही कारवाई थांबवावी’, अशी मागणी केली होती !
एप्रिल २०१० मध्ये विजय महाजन आणि ‘इन्फोसिस’चे पहिले अध्यक्ष डॉ. जी.के. जयराम यांनी काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू लीडरशिप इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली होती.
५. विकास यादव प्रकरण हे ‘अमेरिकन डीप स्टेट’चे षड्यंत्र !
हे सगळे बिंदू जोडत गेल्यास लक्षात येते की, हा विनोद नाही किंवा पोकळ वल्गना नाहीत, तर भारतात ‘इंटरेस्ट’ असलेल्या ‘अमेरिकन डीप स्टेट’ने आखलेली योजना आहे, ज्यात त्यांचे सगळे ‘नेटवर्क’ सहभागी आहे. विकास यादव प्रकरणात भारताच्या विरोधात जाऊन अमेरिकेची ‘री’ ओढणारी काँग्रेस आणि तिचे तथाकथित ‘सिव्हिल स्टेट’चे (नागरिक राज्याचे) कोंडाळे, या ‘नेटवर्क’मध्ये पुरते गुंतलेले आहे. सुजाण नागरिकांनी ही देशविघातक गुंतागुंत समजून घ्यायला हवी.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१८.१०.२०२४)