जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील भाजपचे नेते तहसीन शाहिद यांचा मुलगा हैदर याने एका पाकिस्तानी मुलीशी ऑनलाईन पद्धतीने विवाह केला आहे. या सोहळ्याला भाजपचे स्थानिक आमदार ब्रिजेश सिंह प्रिशू यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते. मुलीला व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याने, तसेच मुलीच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे. व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र.
१. भाजपचे नेचे तहसीन शाहिद यांनी साधारण एक वर्षापूर्वी त्यांचा मोठा मुलगा हैदर याचा विवाह पाकच्या लाहोर येथील अंदलीप झाहर या मुलीशी निश्चित केला.
२. त्यानंतर अंदलीपने भारतीय उच्चायुक्तांकडे व्हिसासाठी अर्ज केला; परंतु दोन्ही देशांतील तणावामुळे मुलीला तो मिळण्यास विलंब झाला. शेवटी ऑनलाईन विवाह करण्याचे ठरले.
३. १८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा तहसीन शाहिद लग्नाच्या शेकडो पाहुण्यांसह इमामबारा कल्लू मरहूम येथे पोचले. या वेळी ‘टीव्ही स्क्रीन’वर सर्वांसमोर ऑनलाईन विवाह सोहळा पार पडला. दोन्ही बाजूंच्या काझी (इस्लामी कायदेतज्ञ) आणि मौलाना (इस्लामचे अभ्यासक) यांनी विवाह लावून दिला.