पुणे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यासाठीचा व्यय १०० कोटी रुपयांनी वाढला !

पुणे – शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम (रस्ते स्वच्छ करणे) यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने ५ वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्या निविदेमध्ये अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्यामुळे ठेकेदारांनी ३८ ते ८० टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या. त्यामुळे झाडणकामांमध्ये १०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. अधिक दराने निविदा भरली असल्याने त्या रहित करण्यात आल्या आहेत. ‘या रस्त्यांची स्वच्छता होणार कि पुणेकरांनी भरलेल्या करांची ?’, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

महापालिकेने पूर्वीच्या निविदेमध्ये पालट करून निविदेची व्याप्ती वाढवली होती. त्यात ५ वर्षांऐवजी ७ वर्षांची निविदा काढली. प्रत्येक परिमंडळाचा प्रतिवर्षाचा व्यय ५ कोटी ८३ लाख रुपये इतका झाला आहे. यापूर्वी हा वार्षिक व्यय ४ कोटी ५१ लाख रुपये इतका होता. विविध कारणांनी निविदा रक्कम वाढली असल्याचे प्रशासकीय म्हणणे आहे.

प्रतिकिलोमीटर १ सहस्र ३३९ रुपये !

फेरनिविदेमध्ये १२ रस्त्यांचा समावेश केला आहे. प्रत्येक रस्त्याची लांबी १० किलोमीटर आहे. ‘स्वीपर’ने दुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग असे ४ वेळा म्हणजे एका रात्रीमध्ये ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रतिकिलोमीटर १ सहस्र ३३९ रुपये इतका दर निश्चित केला आहे. पूर्वी हा दर प्रतिकिलोमीटर १ सहस्र २३ रुपये एवढा होता.