मालवण – शहरातील राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी परमेश्वर यादव (रहाणार मिर्जापूर, उत्तरप्रदेश) याला येथील न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
डिसेंबर २०२३ मध्ये राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी हा पुतळा कोसळला होता. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणात बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली असून हे दोन्ही संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी यादव याला पोलिसांनी १७ ऑक्टोबर या दिवशी मालवण येथील न्यायालयात उपस्थित केले होते.
पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करतांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे आणि योग्य प्रकारे त्याची जोडणी न केल्याने हे साहित्य गंजून पुतळा कोसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करत असतांना निष्पन्न झाले. हे काम यादव यांना देण्यात आले होते.