दादर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातो कचरा !

दुकानांच्या बाहेर टाकण्यात आलेला कचरा

मुंबई – मुंबई महानगरपालिकेकडून ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ (‘डीप क्लीन ड्राईव्ह’) राबवली जात आहे; परंतु ‘डीप क्लीन’ दूरच मुंबईतील मुख्य शहर आणि रेल्वेस्थानक असलेल्या दादर बाजारपेठेत नियमित मुख्य रस्त्यावरच कचरा फेकला जात आहे. बाजारपेठेतील बहुतांश दुकाने आणि हॉटेल्स यांचा कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना नियमित सकाळी स्वच्छता करतांना दुकानदारांनी रस्त्यावर फेकलेला सर्व कचरा उचलावा लागतो. त्यामुळे ‘मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना मुंबई स्वच्छ करण्याच्या आवाहनापुरती ही मोहीम मर्यादित आहे का ?, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नियमित कचरा फेकणार्‍या दुकानदारांवर प्रशासन कारवाई का करत नाही ?’, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

चौकातील कोपर्‍यात ढकलण्यात आलेला कचरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी २०२४ मध्ये मुंबई स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. महिन्याभरापूर्वी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेचे आवाहन करतांना ‘मुंबईतील प्रत्येक गल्ली आणि रस्ता स्वच्छ करा’, असे म्हटले होते. प्रत्यक्षात यानुसार कारवाई होण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कैलास मंदिर या दुकानाजवळून दादर पश्‍चिमेकडे जाणार्‍या रेल्वेस्थानकाच्या जिन्यावरही कचर्‍याचा ढिग असतो. रेल्वेने मुंबईत येणारे अनेक प्रवासी सकाळी दादर रेल्वेस्थानकावर उतरतात. त्यांना या कचर्‍यातूनच जावे लागते. यामुळे स्वच्छ म्हणून नव्हे, तर मुंबईची ‘अत्यंत अस्वच्छ’ अशी अपकीर्ती होत आहे.

बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर कचरा !

दुकानांच्या बाहेर टाकण्यात आलेला कचरा

दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर कैलास मंदिर (कैलास लस्सी) या दुकानाच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य मार्गाकडे जाणारा रस्ता, श्री स्वामी नारायण मंदिराकडे जाणारा रस्ता आणि हिंदमाता बाजाराकडे जाणारा रस्ता, या सर्व मार्गांवरील दुकानांतील कचरा थेट रस्त्यावर फेकला जातो. काही दुकानदार कचर्‍याच्या पिशव्या दुकानांपुढे ठेवतात; मात्र सकाळपर्यंत कुत्रे-मांजरी कचर्‍याच्या पिशव्या फोडत असल्याने तो कचरा रस्त्यावर इतरत्र पसरतो. सकाळच्या वेळेत हा सर्व कचरा रस्त्यावर पसरला जात असल्याने ते दृश्य अत्यंत किळसवाणे दिसून येते. हा सर्व कचरा झाडण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना प्रतिदिन अनेक घंटे वेळ द्यावा लागतो.

रेल्वे स्थानकाच्या पायर्‍यांजवळ टाकण्यात आलेला कचरा

महानगरपालिका प्रशासनाने कचरा टाकण्याविषयी दुकानदारांना नियमावली ठरवून देणे आवश्यक आहे, तसेच रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.