दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !

  • विश्‍व हिंदु परिषद आणि मंदिर अर्चक पुरोहित यांचा उपक्रम !

  • महाराष्ट्र आणि गोवा येथे अभियान राबवणार !

मुंबई – विश्‍व हिंदु परिषद आणि मंदिर अर्चक पुरोहित यांच्या वतीने यंदा महाराष्ट्र अन् गोवा येथे दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबवणे, मंदिरावर भगवे ध्वज लावणे आणि रोषणाई करणे, असा त्रिसूत्री कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन विविध मंदिरांच्या विश्‍वस्तांना केले आहे. २० ऑक्टोबरला सकाळी ७ ते ११ या या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.

१. विहिंप यंदा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत किमान ५ सहस्र धार्मिक ठिकाणी ‘गाभारा ते अंगण स्वच्छता सेवा’ अभियान राबवणार आहे.

२. देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यांमध्ये या संदर्भातील बैठका झाल्या असून मंदिरांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. देवगिरी प्रांतात एकूण २ सहस्र धार्मिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

३. ‘माझे मंदिर, माझी जबाबदारी’ अशा प्रकारची घोषवाक्ये भाविकांनी सिद्ध करून दिली आहेत. भाविकांनी स्वच्छता सेवा देण्यासाठी नावे नोंदवावीत, यासाठी अनेक मंदिरांमध्ये मंदिराच्या बाहेर फलक लावण्याची योजना आखली आहे.

अभियानाचा उद्देश !

भाविकांनी केवळ धार्मिक ठिकाणी जाऊन दर्शन घेणे आणि प्रसाद घेणे, तसेच महाप्रसादात सहभागी होणे, एवढ्यापुरतेच मर्यादित न रहाता धार्मिक ठिकाणाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये स्वतःला जोडावे, यासाठी हे अभियान आहे. मंदिर स्वच्छता सेवेचा उपक्रम बिनखर्चिक असून सेवाभाव जागवणारा आहे. प्रत्येक मंदिर हे स्वच्छ, सुंदर, आल्हाददायी, रमणीय आणि पवित्र असले पाहिजे, ही हिंदु संस्कृतीची मान्यता अन् विश्‍व हिंदु परिषदेची भूमिका आहे. यासाठीही हे अभियान आहे.

विश्‍व हिंदु परिषदेचे आवाहन !

‘दीपावलीच्या दिवशी सर्व मंदिरांनी रोषणाई करावी’, असे आवाहन आणि विनंती विश्‍व हिंदु परिषद सर्व मंदिरांना करणार आहे. ‘मंदिरावर प्रमुख जागी मोठा भगवा ध्वज असावा. ज्या मंदिरांवर आधीपासून लहान ध्वज लावला आहे, तो त्यांनी चांगला करून सर्वांना दिसेल अशा जागी लावावा. ‘गुढीपाडव्याला मंदिरावर लावलेला ध्वज दीपावलीच्या दिवशी पालटावा. ‘मंदिर समाजातील सर्व घटकांचे असून सर्वांना त्यात स्थान आहे’, हा समरसतेचा संदेश सगळीकडे पोचवण्यासाठी, तसेच तरुण पिढी मंदिरांशी जोडली जावी, यासाठी भगव्या ध्वजाचे पूजन तरुण जोडप्यांच्या हस्ते करावे’, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे.