लोकलचा डबा घसरला !
कल्याण – येथे रेल्वे स्थानकाजवळ १८ ऑक्टोबरला रात्री ८.५५ वाजता टिटवाळा-सी.एस्.एम्.टी. लोकलगाडीचा एक डबा रूळांवरून घसरला. यामध्ये कुणीही घायाळ झालेले नाही. तो डबा रात्री १२.४० वाजता रुळांवरून बाहेर काढण्यात आला.
चेंबूर येथे मंदिरात आग
मुंबई – चेंबूर वसाहत परिसरातील संतोषीमाता मंदिरात दुपारी २.१५ वाजता भीषण आग लागली. आग लागताच भाविकांनी मंदिराबाहेर धाव घेतली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या.
पोलिसांवर आक्रमण करणारा आरोपी २६ वर्षांनंतर अटकेत !
मुंबई – मालाड परिसरात दरोड्याच्या काळात पोलीस पथकावर दगडफेक करून प्राणघातक आक्रमण करणारा आरोपी शंकर बाजीराव काळे उपाख्य नाना (वय ५५ वर्षे) याला २६ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. ६ महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडले.
संपादकीय भुमिका : एका आरोपीला पकडण्यास २६ वर्षे लागत असतील, तर पोलीस आतंकवाद्यांना कधी पकडणार ?
विजया राहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा !
मुंबई – भाजप नेत्या आणि राजस्थान भाजपच्या सहप्रभारी विजया राहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा कार्यकाळ ३ वर्षे असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणार्या त्या महाराष्ट्रातील महिला ठरल्या आहेत. त्यांना आता केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जाही असणार आहे.
ओढ्यात मिळाल्या ५०० रुपयांच्या नोटा !
सांगली – येथील आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिराच्या परिसरातील सुख ओढ्यामध्ये सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांना ५०० रुपयांच्या नोटा दिसून आल्या. त्यानंतर ओढ्यातून लाखो रुपये वाहून आले. लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी येथे गर्दी केली. काहींना सहस्रो, तर काहींना लाखो रुपये मिळाले. सुख ओढ्यात वाहून येणार्या नोटा कुठून येत होत्या ? याची माहिती मिळालेली नाही.