नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता नितीन तारमाळे यांचे १८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी वाशीतील फोर्टिस रुग्णालयात उपचाराच्या वेळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते तुर्भे विभागातील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच साहाय्य करणारे तारमाळे हे मितभाषी आणि नम्र होते. तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातील अनेक उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ यांची निर्मिती, तसेच येथील जलवितरण व्यवस्था चोख ठेवण्याकरिता त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. यामुळे तुर्भे, सानपाडा, तुर्भे एम्.आय.डी.सी., कोपरी, वाशी येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरे या गावचे ते होते. मृत्यूसमयी ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महापालिका कर्मचार्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तारमाळे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.