Vladimir Putin praises Bollywood : भारतीय चित्रपट रशियामध्ये पुष्कळ लोकप्रिय ! – व्लादिमिर पुतिन

व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – जर आपण ‘ब्रिक्स’ सदस्य देशांकडे पाहिले, तर मला वाटते की, रशियामध्ये भारतीय चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आमच्याकडे एक विशेष मनोरंजन वाहिनी आहे, जिच्यावर २४ तास भारतीय चित्रपट दाखवले जातात. आम्हाला भारतीय चित्रपटांमध्ये पुष्कळ रस आहे, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.

पुतिन पुढे म्हणाले की,

१. आम्ही ब्रिक्स चित्रपट महोत्सव आयोजित करतो. यावर्षी ‘मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ब्रिक्स देशांचे चित्रपट सादर केले जाणार आहेत.

२. भारत आणि रशिया यांच्यात चित्रपट उद्योगाच्या क्षेत्रात अधिक सहकार्य होऊ शकते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर चर्चा करीन.

३. रशिया आणि भारत यांच्यातील खोल सांस्कृतिक अन् आर्थिक संबंधांमुळे ‘ब्रिक्स’सारखे व्यासपीठ आणखी महत्त्वाचे बनले आहे.

काय आहे ब्रिक्स समूह ?

‘ब्रिक्स’ हा प्रादेशिक घटकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणार्‍या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका, हे त्याचे सदस्य असून जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ४१ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ब्रिक्स समूहाचा जागतिक व्यापारात १६ टक्के, तर जागतिक जी.डी.पी. मध्ये २४ टक्के भाग आहे. या समूहाने एकूण २९.३ टक्के भूभाग व्यापला आहे.