पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्‍या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सांगली, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करत पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९ वर्षे) या महिलेच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वंदना यांच्या विरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे यांनी न्यायालयात दावा प्रविष्ट केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे. वंदना या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत. वंदना यांनी सांगली येथील संजय शिंदे (रा. वखारभाग) यांच्याशी दुसरा विवाह झाल्याची माहिती पहिले पती महेश कांबळे यांना मिळाली. त्यामुळे महेश यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली. (कुटुंबियांची फसवणूक करणारे पोलीस नागरिकांशी कसे वागतील ? – संपादक)

या प्रकरणी जनाबाई कांबळे (वय ६० वर्षे), राजशेखर कांबळे (वय ४२ वर्षे), उषा माळी (वय ४० वर्षे, सर्व रहाणार इनाम धामणी) यांच्यावरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महेश कांबळे हे आष्टा येथे काम करतात. त्यांचा विवाह वंदना यांच्याशी २२ जून २०२२ या दिवशी झाला होता. विवाहानंतर आठवडाभरातच म्हणजे ३० जून या दिवशी त्या माहेरी इनाम धामणी येथे निघून गेल्या. वंदना यांनी महेश यांच्या घरी माणसे पाठवून त्यांच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली, असा महेश यांचा आरोप आहे. त्यानंतर महेश यांनी तक्रार प्रविष्ट केली.