मिरज (जिल्हा सांगली), १६ ऑक्टोबर (वार्ता.) – ऐतिहासिक श्री अंबाबाई मंदिराच्या सुशोभिकरणाचा जुना अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव पालटून नवीन ५ कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव सिद्ध करून तो शासनाकडे सुपुर्द केला. त्यातील पहिली मान्यता ३ कोटी रुपयांची आहे. त्यातून आपण येथे पायाभरणीचा शुभारंभ केला आहे. दगडाच्या बांधकामाचे सुंदर मंदिर होईल. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी पुढील वर्षी डिसेंबरअखेर आणखी २ कोटी रुपये मी मिळवून देईन, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे दिले.
येथील ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिर आणि सभागृह सुशोभिकरणासाठी एकूण ५ कोटी १८ लाख रुपये मान्य झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी भाजपचे नेते दीपकआबा शिंदे म्हैसाळकर, माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, माजी महापौर किशोर जामदार, माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडून आलेला ९ लाख ७५ सहस्र रुपयांचा धनादेश पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ‘श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळा’च्या पदाधिकार्यांना देण्यात आला. या वेळी श्री. प्रशांत गुरव यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शासनाकडे परत गेलेला निधी परत मिळवून हे पैसे मंदिराला मिळवून दिल्याविषयी त्यांचे आभार मानले.
श्री अंबाबाई मंदिराची माहिती देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी
श्री. प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, मिरज येथील वर्ष १८४० मध्ये या भागातील राजप्रतिनिधींनी येथील मंदिरातील श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. वर्ष १६५० मध्ये हे श्री अंबाबाईचे मंदिर बांधले गेले आहे. इतके मंदिर हे पुरातन आणि चैतन्यदायी आहे. १ जानवारी १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरजेच्या गडाला ८ दिवस वेढा घातलेला होता. त्यामुळे या मंदिरात शिवराय येऊन गेले आहेत. पटवर्धन सरकारच्या कागदपत्रांमध्ये श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख आढळतो. वर्ष १९८० मध्ये या मंदिराचे सुशोभिकरण झाले होते. त्या वेळी करवीरपिठाचे शंकराचार्य आले होते.