पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गाचे छत कोसळले

माध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थी गेल्याने मोठा अनर्थ टळला

दोडामार्ग – तालुक्यातील पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक (कुडासे खुर्द) शाळेतील इयत्ता ४ थीच्या वर्गाचे छत १४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी अचानक कोसळले. या वेळी माध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थी गेल्याने मोठा अनर्थ टळला.

या शाळेच्या इमारतीला जवळपास ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीचे छत पूर्णतः कमकुवत बनल्याने कोसळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. ‘शाळेची इमारत जीर्ण झाल्याने तेथे नवीन इमारत बांधण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करू’, असे गवस यांनी सांगितले.
‘शाळेच्या इमारतीच्या दु:स्थितीविषयी शिक्षण विभागाला वारंवार कळवून आणि पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. येथे नव्याने इमारत बांधण्यासाठी  दीपक केसरकर यांनी आवश्यक तो निधी द्यावा. तसेच सध्या याच शाळेत एक वर्गखोली सुस्थितीत आहे. त्या खोलीत मुलांना बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक निर्णय घेणार आहोत’, असे उपसरपंच राजन गवस यांनी सांगितले. (शाळेच्या इमारतीच्या दु:स्थितीविषयी सांगूनही त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपसरपंच राजन गावस यांनी करणे  याचा अर्थ प्रशासन लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, असा समजायचा का ? प्रशासन लोकप्रतिनिधींना जुमानत नसेल, तर ते सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक देत असेल, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)

या वेळी सरपंच श्रद्धा नाईक, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण गवस, विद्यमान अध्यक्ष सूरत शिरसाट, शिवसेना उपतालुका प्रमुख मायकल लोबो यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.