Gujarat Drug Seized : अंकलेश्‍वर (गुजरात) येथे ५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ कह्यात

दुबई-गोवा-गुजरात मार्गे देहली आणि उत्तरप्रदेश, या मार्गाने चालू होती अमली पदार्थांची तस्‍करी

कह्यात घेतलेले अमली पदार्थ

गुजरात – अंकलेश्‍वर येथील एका औषध आस्‍थापनाची झडती घेतांना ५१८ किलो ‘कोकेन’ हा अमली पदार्थ कह्यात घेण्‍यात आला. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत ५ सहस्र कोटी रुपये इतकी आहे. देहली पोलिसांचे विशेष पथक आणि गुजरात पोलीस यांनी १३ ऑक्‍टोबर या दिवशी संयुक्‍तरित्‍या ही कारवाई केली.

१. अमली पदार्थांच्‍या तस्‍करी प्रकरणी अंकलेश्‍वर औषध आस्‍थापनाची भूमिका निश्‍चित करण्‍यासाठी या आस्‍थापनाच्‍या मालकांची चौकशी केली जात आहे. कह्यात घेण्‍यात आलेले ‘कोकेन’ गोव्‍यात आले होते आणि नंतर त्‍याच्‍या शुद्धीकरणासाठी गुजरातमध्‍ये आणला असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. या औषधांवर प्रक्रिया झाल्‍यानंतर ते देहली आणि उत्तरप्रदेश येथे पाठवली जातात. तिथून त्‍याची विक्री केली जाते.

२. देहली पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणी मागील १५ दिवसांत केलेली ही तिसरी कारवाई होती. आतापर्यंत एकूण १ सहस्र २८८ किलो कोकेन कह्यात घेण्‍यात आले आहे. पहिली कारवाई १ ऑक्‍टोबर या दिवशी देहलीतील महिपालपूर येथे झाली होती. तेथून ५६२ किलो कोकेन पकडण्‍यात आले होते, तर १० ऑक्‍टोबर या दिवशी देहलीतील रमेशनगरमध्‍येही २०८ किलो कोकेन कह्यात घेतले होते. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, आरोपींनी दुबईहून जुन्‍या मालवाहू जहाजांमधून गोव्‍यात कोकेन आणले होते, असे देहलीत झालेल्‍या कारवाईच्‍या प्राथमिक चौकशीत समोर आले होते.

३. देहली पोलिसांच्‍या अधिकार्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार मागील २ आठवड्यांत केलेल्‍या कारवायांमध्‍ये ७ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडला गेला, तर प्रत्यक्षात किती प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाली असणार !
  • मुळात अमली पदार्थांची तस्करी होतेच कशी, याचे अन्वेषण झाले पाहिजे !