महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने नुकतेच गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केले. असे असले, तरी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री असतांना वर्ष १९५३ मध्ये भाकड गायी शेतकर्यांसाठी आर्थिक बोजा असल्याचे सांगत गोहत्येचे समर्थन केले अन् गोवध बंदी विधेयकाला विधानसभेत विरोध केला होता. गोमातेच्या पालन-पोषणसाठी पैसा लागतोच. व्यवहारात पैशाचे महत्त्वही नाकारता येत नाही; म्हणून गोमातेकडेही अर्थार्जनाच्या दृष्टीने पहायला भारत काही भांडवलशाही देश नाही. भारत भौतिकतावादी नव्हे, तर आध्यात्मिक पाया असलेला देश आहे. पाश्चात्त्यांनी कितीही भौतिक विकास साधला, तरी आत्मशांतीसाठी जगाच्या पाठीवर त्यांना भारतातच यावे लागते. भारताची ही महानता येथील आध्यात्मिक संस्कृतीमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वत: गोपालन केले आणि स्वत: ‘गोपाळ’ नाव धारण केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनीही स्वत:ला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही उपाधी लावली. गोमातेचे श्रेष्ठत्व विषद करणारी शेकडो उदाहरणे भारतीय संस्कृतीमध्ये आढळतात. त्यामुळे आर्थिक कारणासाठी गोहत्येचे समर्थन, म्हणजे करंटेपणा ठरेल. वृद्ध आई-वडिलांना पोसणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात टाकण्याचे प्रकार भारतातही चालू झाले आहेत; परंतु ही काही आपली संस्कृती नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या गोहत्येच्या अविचारांची काँग्रेसने पुरोगामित्वाचा मुलामा देऊन भलावण केली, तरी भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गोहत्या त्याज्यच ! महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना भ्रमित करणार्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आढावा या लेखाद्वारे घेऊया !
१. मुंबई राज्यात गोवध बंदीसाठी विधेयक !
वर्ष १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले; मात्र त्यापूर्वी मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा होता. बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. मुंबईचे दुसरे मुख्यमंत्री मोरारजी देसाई असतांना वर्ष १९५३ मध्ये विरोधी पक्षाचे आमदार पुरुषोत्तमभाई पटेल यांनी ‘सरकारने गोवध बंदी कायदा आणावा’, यासाठी विधानसभेत विधेयक मांडले. २ एप्रिल १९५३ या दिवशी कृषीमंत्री भाऊसाहेब हिरे सभागृहात उपस्थित नसल्याने तत्कालीन पुरवठामंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सरकारच्या वतीने या वेळी सभागृहात भूमिका मांडली.
२. मुसलमानांसाठी पायघड्या अन् गोहत्या बंदीची खिल्ली !
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी देशभरात गोहत्या बंदी कायदा करण्यात यावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या मोहिमेनंतर संरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांनी देहली येथे भाषणात ‘गोहत्या हा आर्थिक नव्हे, तर हिंदूंच्या भावनांशी जोडलेला विषय आहे’, असे वक्तव्य केले. याचा संदर्भ देतांना यशवंतराव चव्हाण यांनी गोहत्या बंदी कायद्यासाठी चालू असलेल्या चळवळीची खिल्ली उडवली. ‘काँग्रेस गोवधासाठी आतुरलेली नाही. देशात गोवध होऊ नये, अशीच आमची इच्छा आहे; परंतु आर्थिक बाजू पहाता या प्रश्नाकडे धार्मिक दृष्टीने पाहिले जाऊ नये’, असे म्हटले. यशवंतराव चव्हाण हे त्याच काँग्रेसचे नेते आहेत ज्या पक्षाने मुसलमान धर्मियांच्या लांगूलचालनासाठी देशहित वेळोवेळी खुंटीला टांगले. मुसलमानांना सोयीसुविधांची खैरात वाटली. त्याच काँग्रेसचे नेते गोवध बंदीविषयी मात्र आर्थिक कारण पुढे करतात केवढा हा दुजाभाव !
३. (म्हणे) भाकड गायींचा शेतीवर बोजा !
‘उत्पादन किंवा शेतीकाम यांच्या दृष्टीने काही उपयोग नाही, अशी देशात १ कोटी ४० लाख जनावरे आहेत. अशी जनावरे, म्हणजे देशातील शेतीवर एक प्रकारे बोजा आहेत. या जनावरांच्या खाद्यासाठी जवळजवळ १०० कोटी रुपये इतका व्यय येतो’, असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभेत केले होते. भाकड गायी किंवा गोवंश आर्थिक बोजा म्हणणार्या यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात जाऊन काही शेतकर्यांकडेही वृद्ध झालेली गाय आणि बैल अधिक पैसे देऊन कापण्यासाठी मागितले असते, तर त्यांना कळले असते की, शेतकर्यांच्या काय भावना असतात. ज्यांनी शेतात ऊन-पावसात कष्ट घेऊन शेत पिकवले आणि कुटुंब पोसले, त्यांना पैशांसाठी कापायला देण्याइतके भारतातील शेतकरी कृतघ्न नाहीत. यशवंतराव स्वत: शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी कदाचित् शेतकर्यांच्या ऐवजी कसायाच्या भावना समजून घेतल्या असाव्यात.
४. (म्हणे) कायदा नको, प्रबोधन हवे !
‘गायीविषयी धार्मिक भावना न्यून झाल्या म्हणून विधीमंडळात कायदा आणून तिचे रक्षण करणे इष्ट ठरणार नाही. जीर्ण श्रद्धा आणि भावना कायद्याने पुनरूज्जीवित होणार नाहीत. गोरक्षणासाठी जनतेमध्ये गोरक्षणाची वृत्ती निर्माण केली पाहिजे’, असा अजब सल्ला यशवंतराव चव्हाण यांनी दिला. याचा अर्थ ‘बलात्कारी व्यक्तींना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या मनात स्त्रीविषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, हा बलात्कार रोखण्याचा उपाय आहे’, असे म्हणण्यासारखे आहे. समाजात स्त्रीविषयी आदराची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत; मात्र याचा अर्थ असा नव्हे की, बलात्कार्यांसाठी कठोर कायदा करू नये. ज्यांना सांगून कळत नाही, त्यांच्यासाठी शिक्षेचा अवलंब करावा लागतो. प्रबोधन आणि शिक्षा या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा लागतो. त्याचप्रमाणे गोहत्या रोखण्यासाठी प्रबोधन हे करायलाच हवे; मात्र कठोर शिक्षाही व्हायला हवी. यशवंतराव चव्हाण यांना मात्र हे कळू नये, हे मोठे दुर्दैव होय.
५. समाजवादी नेते एस्.एम्.जोशी यांना जे कळले ते यशवंतरावांना उमजले नाही !
‘गोवध बंदीचा कायदा यावा’, यासाठी समाजवादी विचारसरणीचे नेते एस्.एम्.जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राबवण्यात आलेल्या गोहत्या बंदी कायद्याच्या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली आणि विधानसभेतील भाषणात भाकड गायींमुळे शेतकर्यांवर आर्थिक बोजा येत असल्याचेही म्हटले. यावरून जोशी दोन्ही बाजूने बोलत असल्याची टीका यशवंतराव यांनी केली. समाजवादी असूनही एस्.एम्.जोशी यांनी ‘भाकड गायी आहेत; म्हणून गोहत्या करावी’, असे विचार मांडले नाहीत. यावरून जोशी यांना भारतीय संस्कृतीमधील गोमातेचे महत्त्व उमगले आहे, हे दिसून येते; मात्र शेतकरी कुटुंबातील यशवंतराव चव्हाण यांना ते उमजले नाही.
६. (म्हणे) गोमातेविषयी मुसलमानांमध्ये त्याग भावना निर्माण करा !
‘भारतात गायीचे स्थान उच्च राखावयाचे असेल आणि ती खर्या अर्थाने गोमाता व्हावी, असे सन्माननीय सभासदांना खरोखर वाटत असेल, तर ती व्यक्ती मुसलमान आहे की, अन्य कोणत्या धर्माचा आहे, हे लक्षात न घेता गायीविषयी त्याग करण्याची भूमिका त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे’, असे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटले. हिंदूंच्या धर्मभावना लक्षात घेऊन मुसलमान गोहत्या बंदीला सिद्ध होतील, असा विश्वास यशवंतराव चव्हाण यांना वाटत असेल, तर गांधीजींच्या वागण्यातून त्यांनी काहीच बोध घेतला नाही, असे म्हणावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुसलमानांनी सहभागी व्हावे, यासाठी गांधींनी स्वत:च्या मृत्यूपर्यंत अनेकविध प्रयत्न केले; मात्र स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याऐवजी मुसलमानांनी भारतालाच खंडित केले. मुसलमानांचे हित जोपासणार्या गांधी यांच्या अस्थीही पाकिस्तान गेलेल्या मुसलमानांनी स्वीकारल्या नाहीत. अशा वृत्तीच्या लोकांमध्ये यशवंतराव गोमातेसाठी त्याग करण्याची भावना निर्माण करायला सांगणे, हे कितपत योग्य ? सध्या महाराष्ट्रात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मुसलमान हिंदूंच्या भावनांचा किती आदर करतात, हे दिसून येतच आहे. यावरून यशवंतराव चव्हाण यांना मुसलमानांविषयी असलेला विश्वास किती निरर्थक आहे, हे दिसून येते.
७. गोसंवर्धनासाठी योगदान देणे आवश्यक !
‘भारतातील लोकांच्या मनात गोमातेविषयी पवित्र भावना आहेत; पण गोमातेचे रक्षण व्हायला हवे’, असे म्हणणार्यांनी खिशाला झेपेल म्हणून गायीऐवजी म्हशीचे दूध घेतले, तर गोरक्षणाला काय अर्थ आहे ? गायीची सर्व प्रकारे जोपासना करून तिच्या दुधाविषयी आवड निर्माण करणे आणि तिच्या रक्षणाचे दायित्व घेणे किती आवश्यक आहे, ही भावना समाजाच्या सर्व स्तरापर्यंत निर्माण केली गेली, तर गोपालनाचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडवता येईल आणि शेतीमधील गायीचे महत्त्व पुन्हा प्राप्त करता येईल’, असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांच्या या वक्तव्याविषयी मात्र हिंदूंनी निश्चितच चिंतन करण्याची आवश्यकता आहे.
८. श्रद्धेचे राजकारण करू नये !
‘गोहत्येसाठीचा कायदा राजकीय लाभासाठी आणला जाऊ नये. गायीविषयी खरोखरच्या प्रेमापोटी गोहत्या राेखण्यासाठी प्रयत्न व्हावेत’, अशा आशयाचे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यांचे हे विधान निश्चितच समर्थनीय आहे; कारण राजकीय लाभानुसार राजकारण्यांची धोरणे पालटतात. त्यामुळे गोमाताच काय, तर कोणत्याही धार्मिक विषयाचे मतांसाठी राजकारण करणे, हे अत्यंत चुकीचे आणि धर्मभावनांशी खेळ करण्याचा प्रकार आहे.
९. गोसंवर्धनासाठी यथायोग्य सहभाग घ्यायला हवा !
‘श्रीमंतांचे प्रतिनिधी आणि राजे-महाराजे यांना गायीचा अचानक पान्हा फुटलेला दिसत आहे. हे सगळे राजेरजवाडे जणू काय दिलीप राजाचे आधुनिक वारसदार असल्याच्या थाटात गायीचे रक्षण केले पाहिजे, असा मुक्तकंठाने आक्रोश करू लागले आहेत; परंतु त्यापैकी कुणी गोशाळा किंवा पांजरपोळ काढल्याचे ऐकिवात नाही. उलट रेससाठी असलेल्या घोड्यांचे तबेले त्यांच्याकडे असल्याचे मात्र जगजाहीर आहे’, असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी केले. सूर्यवंशीय प्रभु श्रीराम यांचे पूर्वज राजा दिलीप हे गायीला वाचवण्यासाठी सिंहापुढे स्वत: भक्ष्य म्हणून प्राण द्यायला सिद्ध झाला होता. यावरून हिंदूंनी गोमातेचे महत्त्व समजून घ्यायला हवे. त्यामुळे गोहत्या होऊ नये, असे वाटणार्यांनी गायीच्या संवर्धनासाठी यथायोग्य सहभाग घ्यायला हवा. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचे हे वक्तव्य निश्चितच अनुकरणीय आहे.
यशवंतराव चव्हाण यांना गोमातेविषयी आदर नाही, असे नाही; मात्र राजकीय व्यक्तींनी धार्मिक सूत्रावर बोलतांना धर्मशास्त्र काय सांगते ?, धर्मगुरु, संत आणि धर्मशास्त्राचे जाणकार यांचे याविषयी मत काय आहे ?, हे विचारात घेणे आवश्यक आहे. हे केवळ यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाचा कारभार करतांना हा विचार होणे आवश्यक आहे. पूर्वीचे राजे आध्यात्मिक गोष्टींमध्ये राजगुरूंचे मार्गदर्शन घेत असत; मात्र सध्याच्या लोकशाहीत ही व्यवस्था नाही. काही राजकारणी नास्तिक असतात किंवा अनेकांना धर्मशास्त्राचा अभ्यास नसतो; मात्र तरीही ते धार्मिक प्रश्नावर तज्ञ असल्याप्रमाणे बोलतात. याचा परिणाम चुकीचा निर्णय, कायदा यांद्वारे समाजावर होत असतो. सद्यःस्थितीतही मंदिरांचे सरकारीकरण, श्री शनैश्वरदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश, मंदिरांतील पुजार्यांची आरक्षणाद्वारे नियुक्ती आदी निर्णय हे धर्मशास्त्रानुसार अयोग्य आहेत. समाजाला धर्मशिक्षण दिल्यास आणि शासनकर्त्यांनीही धर्मपालन केल्यास हे प्रश्न सुटू शकतील.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (९.१०.२०२४)