जागर नवरात्रोत्सवाचा

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

सध्या नवरात्र चालू असल्याने विविध भागांमध्ये ‘नवदुर्गां’ची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघण्टा, कुष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिरात्री अशी ‘नवदुर्गां’ची नावे आहेत. ८ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्कन्दमाता’ आणि ‘कात्यायनी’ या देवींची माहिती जाणून घेतली. आज आपण ‘कालरात्री’ आणि महागौरी या देवींची माहिती जाणून घेणार आहोत.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/842212.html

इ. कालरात्री

कालरात्री

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरस्थिता ।
लम्बौष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ।।
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा ।
वर्धनमूर्ध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ।।

अर्थ : केसांची एक वेणी घातलेली, कानाभोवती जास्वंद आभूषणाप्रमाणे धारण करणारी, नग्न, गाढवावर आरूढ झालेली, मोठे लोंबणारे ओठ असलेली आणि कानात कर्णभूषणे धारण केलेली, तेलाने लिप्त असे चकाकणारे शरीर असलेली, डाव्या पायात धातूची काटेरी वेल (अलंकार) शोभणारी, आपल्या भक्तांची समृद्धी वाढवणारी अन् गडद काळा रंग असलेल्या भयंकर अशा देवी कालरात्रीला मी वंदन करतो.

१. देवीचे वर्णन

७वा अवतार किंवा ७व्या रूपाचे नाव आहे कालरात्री ! जेव्हा एखादे संकट येते किंवा भीती वाटते, तेव्हा आपणाला आईची आठवण येते. अशा वेळी आपण ‘आई ग’, असे म्हणून मोठ्याने ओरडतो. जेव्हा असुर प्रबल ठरले, देवतांनाही आवरेनासे झाले, तेव्हा सर्व देवांनी अशीच या जगन्मातेची आठवण काढली आणि ती माता वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात प्रकट झाली अन् दुष्टांचे निर्दालन केले. हिचे नावच कालरात्री आहे. या देवीचे रूप उग्र आहे. अंगकांती कोळशाप्रमाणे काळी आहे. केस विखुरलेले आणि त्याच्या जटा झालेल्या आहेत. ही देवी चतुर्भूजा आहे. उजवीकडील हातांची वरमुद्रा आणि अभय मुद्रा आहे. डावीकडील हातात लोखंडाचा काटा आहे आणि दुसर्‍या हातात तीक्ष्ण धारेची तलवार आहे. या देवीला ३ नेत्र आहेत. गळ्यात विद्युल्लतेप्रमाणे चमकणारी माळ आहे. नेत्र आरक्त आहेत आणि जणू अग्नी गोल फेकत आहेत, असे वाटतात. ती जोरजारोत उष्ण श्वासोच्छ्वास करत आहे. रागाने थरथर कापत आहे. तिचे वाहन गाढव आहे. खाली व्याघ्रचर्म (वाघाचे कातडे) आणि वर रक्तवस्त्र (लालवस्त्र) परिधान केलेले आहे.

२. देवीची अन्य नावे आणि त्यानुसार तिचे वर्णन

नवरात्रातील ७ व्या दिवशी हिची उपासना केली जाते. याच देवीची पूजा बंगाल राज्यात  ‘कालीमाता’ या नावाने करण्यात येते; पण तिथे तिचे थोडे वेगळे रूप दाखवले जाते. भेसूर चेहरा उग्ररूप, जीभ लांब बाहेर काढलेली, एका हातात राक्षसाचे डोके, दुसर्‍या हातात तलवार, तिसर्‍या आणि चौथ्या हातात अस्त्र, गळ्यात नरमुंडाची माळ, रक्ताने मळवट भरलेली, अशी देवी म्हणजे कालीमाता ! काळी जादू करणारेही याच देवीची अघोरी उपासना करतात. तिला रक्त मांसाचा नैवेद्य दाखवतात, असे सांगितले जाते. जरी हे तिचे रूप भयप्रद असले, तरी तिची कृपा ज्याच्यावर होते, त्याला मात्र ती उत्तमच फळ देते. त्यामुळे तिला अजून एक नाव आहे शुभंकरी !

ई. महागौरी

महागौरी

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः ।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ।।

अर्थ : शुभ्र बैलावर आरूढ असलेली, शुभ्र वस्त्र परिधान करणारी, भगवान शंकराला आनंद देणारी महागौरी मला कल्याण प्रदान करो.

सुन्दरीं स्वर्णवर्णाभां सुखसौभाग्यदायिनीम् ।
सुभद्राजननीं देवीं सुभद्रां पूजयाम्यहम् ।।

अर्थ : सुंदर, सोनेरी रंगाच्या तेजानेयुक्त, सुख आणि सौभाग्य प्रदान करणार्‍या, कल्याणकारी अशा देवीचे, सुभद्रेचे मी पूजन करतो.

१. देवीचे लोभस वर्णन

देवीच्या ८व्या रूपाचे किंवा अवताराचे नाव आहे महागौरी ! ही देवी श्वेतांगी आहे. अतिशय लोभसवाणी गौरवर्णी असलेली ही गौरी चतुर्भूजा आहे. तिच्या उजवीकडील एका हातात त्रिशूळ, तर दुसरा हात वरमुद्रेत आहे. डावीकडील एका हातात डमरू, तर दुसर्‍या हाताची अभय मुद्रा आहे. डोकीवर चंदेरी मुकूट आहे. त्याला शुभ्र मोती लावलेले आहेत. हातात, कानात, गळ्यात असलेली आभूषणेही श्वेत वर्णाची आहेत. तिने नेसलेले वस्त्रही पांढर्‍या रंगाचे आहे. तिचे वाहनही पांढर्‍या रंगाचा वृषभ (बैल) आहे.

२. महागौरीच्या कथा

या देवीच्या २ वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. एका कथेप्रमाणे शुंभ-निशुंभ, चंड-मुंड, मधु-कैटभ, महिषासुर इत्यादींचा नाश करण्यासाठी देवीने विराट रूप धारण केले. त्या असुरांचा नाश केला; पण तो दाह किंवा क्रोध शांत होईना. सर्व देवांनी आपापल्या परीने त्या महाकालीला शांत करण्याचा प्रयत्न केला; पण तोही निष्फळ ठरला; मग सर्वांनी सर्व कला, विद्यांची देवता असलेल्या महासरस्वतीला आवाहन केले. तिने आपल्या विणेतून उत्तम सूर काढून त्या कालीमातेला शांत केले; म्हणून ८व्या दिवशी तिचे पूजन केले जाते. तिचेच रूप स्वतः कालीमाता धारण करते; म्हणून तिच्याप्रमाणेच सगळेच श्वेतवर्णी.

दुसर्‍या कथेनुसार हे व्रत नवरात्रात ८व्या रात्री कोकणस्थ ब्राह्मणांकडे ‘महालक्ष्मी पूजन’ या नावाने केले जाते. सुवासिनींनी लग्नानंतर ५ वर्षांपर्यंत हे व्रत करायचे असते. सकाळी पूजा करायची आणि संपूर्ण दिवस उपवास करायचा. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तांदळाच्या पिठाच्या उकडीचा देवीचा मुखवटा करून घागर किंवा तपेल्यावर बसवायचा. त्या देवीला साडी-चोळी दागिने, बांगड्या घालायच्या. तिची पूजा करायची. घागरी फुंकायच्या, रात्र जागवायची आणि पहाटे उत्तरपूजा करून तिला पोचवणे, अशी पद्धत आहे. उकड तांदळाचीच; कारण ती श्वेतकांती आहे. या देवीच्या उपासनेमुळे सौभाग्य प्राप्त होते. सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. ‘देवी भागवतात’ या देवीविषयी अनेक माहिती उपलब्ध आहे.

– ह.भ.प. उदयबुवा फडके, गोवा.

(साभार : दैनिक ‘गोमंतक’, ९ ऑक्टोबर २०१६)