जागर नवरात्रोत्सवाचा

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

सध्या नवरात्र चालू असल्याने ‘नवदुर्गां’ची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघण्टा, कुष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिरात्री, अशी ‘नवदुर्गां’ची नावे आहेत. आजच्या लेखात आपण ‘स्कन्दमाता’ आणि ‘कात्यायनी’ या देवींची माहिती जाणून घेणार आहोत.

देवी ‘स्कन्दमाता’

अ. स्कन्दमाता

सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ।।

अर्थ : सिंहावर आरूढ असलेली, दोन्ही हातांमध्ये कमळ धारण केलेली यशस्विनीदेवी स्कन्दमाता मला कल्याण प्रदान करणारी होवो.

चण्डवीरां चण्डमायां चण्डमुण्डप्रभञ्जिनीम् ।
तां नमामि च देवेशीं चण्डिकां पूजयाम्यहम् ।।

अर्थ : प्रचंड वीरता असलेल्या, उग्र मायेने युक्त अशा, चंड आणि मुंड यांचा नाश करणार्‍या देवांच्या देवीला, चंडिकेला मी नमस्कार करतो अन् तिचे पूजन करतो.

१. स्कन्दमातादेवीची विविध नावे

नवदुर्गेच्या ५व्या रूपाचे किंवा अवताराचे नाव आहे स्कन्दमाता ! स्कन्द म्हणजे षडानन, कार्तिकेय, मुरुगन शंकर – पार्वतीचा प्रथम पुत्र. हिचेच एक नाव अंबिका. ती पार्वतीच्या शरीर कोषातून प्रकट झाली; म्हणून तिला ‘कौशिकी’ही म्हणतात. तिने चंड-मुंड या असुरांना मारले; म्हणून तिला ‘चामुंडा’ही म्हणतात. थोडक्यात ती घटना अशी, ‘देवीच्या सात्त्विक रूपाचे वर्णन शुंभ-निशुंभांनी ऐकले आणि तिला उचलून आणण्यासाठी एक दूत पाठवला. दूताने देवीला निरोप सांगितला. देवीने स्मितहास्य केले आणि म्हणाली, ‘तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. शुंभ त्रैलोक्याधिपती आणि निशुंभ हाही महापराक्रमी आहे; परंतु मी आत्मबुद्धीने अगोदरच एक पण करून बसले आहे की, जो कुणी मला रणांगणात पराजित करील, त्याच्याशीच मी लग्न करीन. माझा निरोप तुमच्या मालकांना सांगा.’ हा उलट निरोप मिळताच संतापलेल्या शुंभाने धुम्रलोचन नावाच्या राक्षसाला तिला पकडून आणण्यासाठी पाठवले; पण तो निष्प्रभ ठरला. देवीने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्मसात् केले. त्यामुळे आणखीनच चिडलेल्या शुंभाने चंड-मुंड या अतीपराक्रमी दैत्यद्वयींना पाठवले.

२. देवीचे वर्णन

देवीचे रूप सात्त्विक आहे. ती चतुर्भूजा आहे. उजवीकडील वरच्या हातात तिने कमलपुष्प घेतले असून खालच्या हाताने तिने कार्तिकेयाला आपल्या मांडीवर घेतले आहे. तिचा उजवा पाय दुमडलेला, तर डावा पाय खाली सोडलेला आहे. डाव्या बाजूच्या एका हातात कमलपुष्प आहे. दुसर्‍या हाताने ती वरमुद्रा दाखवते आहे. मस्तकावर रत्नजडित सुवर्णमुकूट असून सुवर्ण कर्णभूषणांनी तिच्या कानांची शोभा वाढते आहे. देवीचे वाहन सिंह आहे.

३. चंड-मुंड दैत्यांचा वध

हे रूप पाहून चंड-मुंड दोघे इतके मोहित झाले की, ते युद्ध करायचेच विसरले. तिच्याकडे पहातच राहिले. शत्रूला बेसावध ठेवून आक्रमण करणे, ही युद्धनीतीच आहे. त्याचाच उपयोग मातेने केला. त्या दोघांनाही देवीने सैन्यासह ठार केले; म्हणून तिला ‘चामुंडा’ही म्हणू लागले.’ सर्वसामान्यपणे चामुंडेचे स्वरूप वेगळे दाखवण्यात येते. असुराच्या छाताडावर एक पाय, शूल हातात धरलेली रौद्ररूपातील मूर्ती सर्रास पहायला मिळते; परंतु ती युद्ध करतांनाची स्थिती आहे.

नवरात्रीमध्ये ५व्या दिवशी हिची पूजा केली जाते. हिच्या उपासनेने भक्तांच्या समस्त इच्छा पूर्ण होतात. त्याला मोक्षपद मिळते.

श्री कात्यायनीदेवी

आ. कात्यायनीदेवी

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवघातिनी ।।

अर्थ : चंद्राप्रमाणे तेजस्वी, सिंहावर आरूढ झालेली, दानवांचा नाश करणारी देवी कात्यायनी आमचे कल्याण करो.

सदानन्दकरीं शान्तां सर्वदेवनमस्कृताम् ।
सर्वभूतात्मिकां लक्ष्मीं शाम्भवीं पूजयाम्यहम् ।।

अर्थ : सदैव आनंद देणार्‍या, शांत, सर्व देवांनी जिला नमस्कार केला आहे, अशा सर्व प्राणीमात्रांच्या ठायी वसलेल्या लक्ष्मीचे, शांभवीचे मी पूजन करतो.

१. देवीच्या अवताराची कथा

देवीच्या ६ व्या रूपाचे किंवा अवताराचे नाव आहे कात्यायनी ! महर्षि भगवान कात्यायन यांनी अपत्यप्राप्तीसाठी घोर तपस्या केली. त्यामुळे माता भगवतीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला, ‘मी तुझ्या घरी तुझ्या कन्येच्या रूपात येईन.’ देवीने वर दिल्याप्रमाणे तिने भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला महर्षि कात्यायन यांच्या घरी जन्म घेतला. आश्विन शुद्ध सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींच्या दिवशी देवीने महर्षि कात्यायन यांच्याकडून पूजा स्वीकारली. महर्षि कात्यायन यांची मुलगी म्हणून ती कात्यायनी ! आश्विन शुद्ध दशमीला याच कात्यायनीने महिषासुराचा वध केला; म्हणून तिचे दुसरे नाव ‘महिषासुर मर्दिनी’, असेही आहे. भारताच्या वरच्या भागात, म्हणजेच उत्तर भारतात या देवीला ‘शेरोवाली मां’, असे म्हणतात.

२. देवीचे वर्णन

ही देवी वज्रमंडलाची अधिष्ठात्री आहे. हिचे रूप अत्यंत विलोभनीय आहे. ही देवी एक पाय दुमडून सिंहावर आरूढ झालेली आहे. ही चतुर्भूजा आहे. उजवीकडील हातांची अभय आणि वरमुद्रा आहे, तर डावीकडील एका हातात कमलपुष्प अन् दुसर्‍या हातात खड्ग घेतलेले  आहे. रत्नजडित सुवर्णमुकूट धारण केलेल्या या मातेने नाकात रत्नजडीत नथ आणि कानात कर्णभूषणे धारण केली आहेत. या देवीचे रूप जरी दिसायला सुंदर आणि मोहक दिसत असले, तरी ती जेव्हा क्रोधायमान होते, तेव्हा ती अतीउग्र दिसते.

‘महिषासुर मर्दिनी’

३. महिषासुराचा वध

जेव्हा महिषासुर मदांध होऊन सर्वदूर अत्याचार करू लागला, तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन या देवीची आराधना केली. देवी प्रकट झाली आणि तिने सर्वांना तिच्या साहाय्याला येण्याविषयी सांगितले. सर्वांनी आपापल्या परिने साहाय्य केले. कुणी त्रिशूळ दिला, कुणी खड्ग, कुणी धनुष्यबाण, कुणी शंख, कुणी अंकुश, कुणी पाश दिले.

तात्पर्य सर्वांनी तिला साहाय्य केले आणि देवीने त्या शस्त्रांच्या साहाय्याने आणि स्वतःच्या शक्तीने महिषासुराचा नाश केला. जाता जाता त्या महिषासुराने देवीकडे मागणी केली, ‘मी केवळ माझ्या उन्मत्तपणामुळे संपलो; पण निदान माझे नाव तरी चिरंतन राहू दे.’ त्याची विनंती देवीने मान्य केली आणि तिने स्वतःच्या नावातच त्याचे नाव घालून ‘महिषासुर मर्दिनी’ हे नाव धारण केले. सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारही पुरुषार्थांचा लाभ होतो.

– ह.भ.प. उदयबुवा फडके, गोवा.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, ७ ऑक्टोबर २०१६)