Pakistan Temple Convert Into Babari Mosque : पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिराचे ‘बाबरी मशिदी’त रूपांतर !

‘बाबरी मशिदी’त रूपांतर झालेले पाकिस्तानातील हिंदू मंदिर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याला ‘बाबरी मशीद’ असे नाव देण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील यू ट्यूबर (स्वत:च्या यू ट्यूब वाहिनीवर स्वतःचे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती) माखन राम जयपाल यांनी या मंदिराचे सत्य त्यांच्या व्हिडिओतून दाखवले आहे. जेव्हा जयपाल कॅमेरा घेऊन मंदिरात पोचले, तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी आधी मंदिराला ‘गुरुद्वारा’ म्हटले; पण जेव्हा त्यांनी बारकाईने पाहिले, तेव्हा त्यांना ते मंदिर असल्याचे दिसून आले. मंदिराचा बराचसा भाग कोसळला आहे; परंतु उर्वरित भागावर अद्याप पुरावे आहेत. मंदिराचा एक घुमट शिल्लक आहे, ज्यावर ‘ॐ’ असे स्पष्टपणे लिहिलेले दिसते. घुमटाच्या वर भोंगे बांधले आहेत. यावरून अजान ऐकवण्यात येते. याविषयी जेव्हा जयपाल एका व्यक्तीशी बोलले, तेव्हा तिने सांगितले की, हे मंदिर आता मशिदीत रूपांतरित झाले आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांतील हिंदूंची आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची होणारी स्थिती ! याविषयी भारतातील एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष कधी तोंड उघडत नाहीत आणि देशातील हिंदूही त्यांना प्रश्‍न विचारत नाहीत; कारण हिंदूंनाही त्यांच्या धर्मबांधवांविषयी, धर्मस्थळांविषयी कोणतीही आपुलकी नाही !