सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।
अर्थ : जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्रवस्त्र धारण केले आहे, जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत, जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.
या ध्यान श्लोकात देवी सरस्वतीच्या सगुण रूपाचे वर्णन केले आहे. वेदकालीन ऋषींना ‘सरस्वती’ ठाऊक होती; पण ती ‘देवी’ म्हणूनच नव्हे, तर एक पवित्र नदी म्हणून ! देवी सरस्वतीचे आजचे सगुण रूप वेदकाळात अस्तित्वात नव्हते.
१. आर्यांच्या संस्कृतीचे प्रतीक सरस्वती नदी !
सरस्वती नदीच्या तीरावरच वेदातील अनेक ऋचांचा जन्म झाला. तेथेच आर्यांचे लहान-मोठे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडू लागले. वेद आणि यज्ञ यांच्या सहचर्याने सरस्वती नदी आर्यांना पूजनीय झाली. आर्यांच्या संस्कृतीत जे जे काही तेजोमय आणि सौंदर्यमय होते, त्याचे प्रतीक, म्हणजे नदी सरस्वती ठरली.
सरस्वती नदीचा उगम मेरू पर्वतावर झाला होता. पुढे ती ‘ब्रह्मावर्त’ आणि ‘आर्यावर्त’ या प्रदेशातून वहात जाऊन प्रयागजवळ (उत्तरप्रदेश) जेथे गंगा-यमुना संगम होतो, तेथेच ती गंगेस मिळाली होती. ‘सतत पुढे व्हा….पुढे व्हा…. आणि स्वतःकरता नव्हे, तर दुसर्याकरता जगा’, असाच संदेश जणू ती आर्यांना देत होती !
‘कालांतराने सृष्टीच्या घडामोडीत ही नदी लुप्त झाली; पण ती प्रयागजवळ गुप्त रूपाने गंगेस मिळते’, अशी हिंदूंची आजही श्रद्धा आहे; म्हणून प्रत्यक्षात जरी गंगा-यमुना या २ नद्यांचा संगम दिसत असला, तरी त्याला ‘त्रिवेणी संगम’ म्हणूनच संबोधले जाते.
२. ‘ब्रह्मावर्त’ प्रदेश आणि आर्यांचे पवित्र ग्रंथ
सरस्वती आणि दृशद्वती या २ नद्यांमधील प्रदेशाला ‘ब्रह्मावर्त’, असे नाव होते. या सुपीक प्रदेशात आर्य स्थिरावले. आपली गायी-गुरे घेऊन तिकडे जनावरांना चारा मिळेल तेथे जायचे, ही आर्यांची जीवनपद्धत होती. ब्रह्मवर्तात आर्य काही काळ स्थिर होऊन शेती करू लागले. यज्ञ-याग करू लागले. आर्य संस्कृतीचा विकास होऊ लागला.
वेद आणि यज्ञ या दोन गोष्टींना आर्यांच्या समाजात त्याकाळी प्राधान्य होते. यज्ञ हा केवळ धार्मिक आचार नव्हता, तर ती एक मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना असे. भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम वेदांमध्ये सापडतो. वेदांमध्ये भारतीय ऋषींचा केवळ कल्पना-विलासच नव्हे, तर त्यांचा आत्मानुभवच आणि त्यांचे आध्यात्मिक ज्ञान यांचाही अविष्कार होतो. वेद ही ईश्वराची निःश्वसिते मानली गेली; म्हणून वेद हे अपौरूषेय ठरले. वेद हेच आर्यांचे पवित्र धर्मग्रंथ.
३. आर्यांची प्रतिज्ञा
एकाच ठिकाणी गढून जाणे, हा आर्यांचा स्वभावच नव्हता. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५. अर्थ : संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.), ही त्यांची प्रतिज्ञा होती, म्हणून ते ब्रह्मवर्तात कायमचे राहिले नाहीत. गंगा-यमुनेच्या प्रदेशाला ‘आर्यावर्त’ म्हणत. ब्रह्मावर्तातून आर्य आर्यावर्तात गेले आणि कालांतराने त्यांनी सारा आर्यावर्त व्यापून टाकला.
नव्या वसाहती बसवतांना आर्यांना असुरांकडून म्हणजे अनार्यांकडून पुष्कळच विरोध झाला. आर्यांची आणि अनार्यांची युद्धे झाली. काही अनार्य जमाती सुधारलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रतिकारही कडवा असे. अशा अनेक युद्धांची वर्णने वेदात येऊन गेली आहेत.
सरस्वती नदीपासून आर्यांच्या पुढच्या पिढ्या कितीही दूर गेल्या, फार काय सरस्वती नदी गुप्त झाली, तरीही आर्यांच्या मनातील सरस्वती नदीविषयीचा पूज्यभाव यत्किंचितही न्यून झालेला नव्हता.
४. आर्यांची दैवते
‘ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।’ (ईशावास्योपनिषद्, मंत्र १), म्हणजे ‘या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे.’ ‘जगात जे काही जीवन आहे, ते सर्व ईश्वराने वसवलेले आहे, तो सर्व शक्तीमान आहे. तोच जगाचा निर्माता, पालनकर्ता आणि विध्वंसकही आहे’, हा विचार वैदिक ऋषींना अपरिचित नव्हता. आजही हा विचार आमच्या पूर्ण परिचयाचा आहे. तरीही आपण अनेक दैवते मानतो आणि त्यांची पूजा करतो.
वेदकाळी अग्नि, वरुण, रुद्र, वायु आणि आदित्य ही आर्यांची दैवते होती. खरे तर निसर्गातील या विविध शक्ती आहेत; पण यांनाच आर्यांनी दैवत रूप मानले होते. या विचाराला अनुसरूनच पुढे हिमालय, गंगा-सरस्वती-यमुना इत्यादी नद्या या निसर्गातील भव्य आणि उदात्त वास्तूंना दैवत रूप मिळाले. यातून सरस्वती नदीचा महिमा विशेषच होता. पौराणिक काळात नदी सरस्वती ही देवी सरस्वती झाली.
५. सरस्वतीदेवी आणि तिचे वाहन हंस यांविषयी अनन्य साधारण माहिती
सरस्वतीलाच ‘शारदा’, ‘वाक्’, ‘वाणी’, ‘भारती’, अशी दुसरी नावे आहेत. या नावांवरून देवी सरस्वती ही वाङ्मयाशी निगडीत आहे, असे दिसून येते. सरस्वती ही विद्या, कला, साहित्य, ज्ञान आणि पावित्र्य यांची देवता ठरली. ‘हंस’ हे सरस्वतीचे वाहन मानले गेले आहे. ‘हंस’ या शब्दाचे दुसरेही अर्थ आहेत. ‘हंस’ म्हणजे प्राण, आत्मा. योगशास्त्रात ‘हंस’ हा शब्द ‘प्राण आणि आत्मा’, या दोन्ही अर्थांनी योजिला गेला आहे. हंस याचा आणखी एक अर्थ आहे. हंस म्हणजे ‘शुद्ध ज्ञान.’ तेव्हा ‘शुद्ध ज्ञान’रूपी हंस पक्षी हा विद्येच्या देवतेचे वाहन ठरला, हे उचितच आहे.
६. सरस्वतीदेवीच्या सगुण रूपाचा ध्यानमंत्र
एका संस्कृत स्तोत्रात देवी सरस्वतीच्या सगुण रूपाचे ध्यान असे वर्णिलेले आहे.
श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता ।
श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना ।।
अर्थ : श्वेत पद्मासनावर विराजमान झालेली देवी सरस्वती श्वेत फुलांनी शोभून दिसत आहे, तिने श्वेत वस्त्र परिधान केले आहे आणि श्वेत गंधाचे लेपन केले आहे.
श्वेताक्षी सूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता ।
श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता ।।
अर्थ : देवी सरस्वतीच्या हातात श्वेत रूद्राक्षांची माळ आहे, ती श्वेत चंदनाने लिप्त आहे, ितने श्वेत वीणा धारण केली आहे, तसेच ती श्वेत अलंकारांनी सुशोभित आहे.
७. सरस्वतीदेवीच्या वर्णनात शुभ्रतेला प्राधान्य का ?
देवी सरस्वतीच्या वर्णनात ‘शुभ्र’ किंवा ‘श्वेत’ या रंगास एवढे प्राधान्य का ? ज्ञान किंवा प्रकाश याचा रंग शुभ्र मानला जातो. याच्या उलट अज्ञानाला काळा अंधःकार म्हटले आहे. सरस्वती ही विद्येची, ज्ञानाची देवता ! मग तिच्या सगुण रूपाच्या वर्णनात शुभ्रतेला प्राधान्य मिळावे, हे तर्कशुद्धच आहे. ती ‘वीणाधरा’ आहे. यातून हेच सूचित होते की, ती संगीतादि कलांची अधिष्ठात्री देवता आहे. एका श्लोकात तर ती ‘वीणा-पुस्तक-धारिणी’ आहे, असे वर्णन आहे. तिच्या हाती पुस्तक आहे. या संकेताचा अर्थ उलगडून सांगण्याची काय आवश्यकता आहे ?
‘माघ शुद्ध पंचमी’ किंवा ‘वसंतपंचमी’ हा सरस्वतीच्या उत्साहाचा दिवस मानला जातो. या दिवशी आसेतूहिमाचल अखिल भारतात अनेक ठिकाणी देवी सरस्वतीचा उत्सव पार पडत असतो.’
– रा.ग. कुंभोजकर
(साभार : मासिक ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक १९७९)