Dominican Citizenship : आर्थिक संकटात सापडलेल्‍या डॉमिनिकन रिपब्‍लिक देशाने नागरिकत्‍व काढले विकायला : किंमत १ कोटी ७० लाख रुपये !


सांटो डोमिंगो – देशातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्‍या सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आर्थिक संकटात सापडलेल्‍या कॅरेबियन बेटांमध्‍ये असलेल्‍या डॉमिनिकन रिपब्‍लिक या देशाने नागरिकत्‍व विकण्‍याची योजना राबवण्‍याचा निर्णय घेतला आहे.

१. जवळपास ७ वर्षांपूर्वी समुद्राने वेढलेल्‍या या देशाला मारिया चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. आधीच अविकसित देशांमध्‍ये गणना होणार्‍या या देशाची आर्थिक परिस्‍थिती चक्रीवादळामुळे अधिकच बिकट झाली.

२. डॉमिनिकाने देशांतर्गत पायाभूत सुविधा आणि विकासकामे यांसाठी अल्‍प पडणारा निधी उभारण्‍यासाठी ‘सिटीझनशिप-बाय-इन्‍व्‍हेस्‍टमेंट’ ही योजना राबवली आहे. या योजनेनुसार डॉमिनिकाने जगभरातल्‍या श्रीमंत आणि अतीश्रीमंत लोकांना देशाचे नागरिकत्‍व देऊ केले आहे; पण त्‍याच्‍या बदल्‍यात या अतीश्रीमंतांना देशामध्‍ये घसघशीत गुंतवणूक करण्‍याची अट घातली आहे. किमान गुंतवणुकीची रक्‍कम २ लाख अमेरिकी डॉलर्स अर्थात् भारतीय रुपयांमध्‍ये जवळपास १ कोटी ७० लाख रुपये इतकी करण्‍यात आली आहे.

३. डॉमिनिकावरची कर्जाची रक्‍कम अजून वाढू नये आणि श्रीमंत देशांकडून ठरलेल्‍या आर्थिक साहाय्‍यासाठी प्रदीर्घकाळ चालणारी प्रतीक्षा टाळण्‍यासाठी हा पर्याय निवडण्‍यात आला आहे, असे देशाचे अर्थमंत्री आयर्विंग मॅकलन्‍टायर यांनी सांगितले.

नागरिकत्‍व विक्रीचे दुष्‍परिणाम !

अशा प्रकारे नागरिकत्‍वाची इतर देशातील लोकांना विक्री केल्‍यामुळे काही समस्‍याही उद़्‍भवण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्‍यात पारदर्शकता आणि सुरक्षा ही सूत्रे सर्वांत महत्त्वाची मानली जात आहेत. ‘नव्‍याने देशाचे नागरिक बनणार्‍या व्‍यक्‍तींची पार्श्‍वभूमी नेमकी काय आहे?’, याविषयी शंका आणि भीती निर्माण होऊ लागली आहे.

संपादकीय भूमिका

एक देश त्‍याचे नागरिकत्‍व विकण्‍यासाठी अधिकृतपणे पैसे घेतो, तर भारत कोट्यवधी लोकांना भारतात घुसखोरी करतांना रोखत नाही आणि अशांना  भारतातील भ्रष्‍टाचारी लोक भारताचे नागरिकत्‍व मिळवून देतात !