Consider Cows As Deities : गोमातेला जनावरांच्‍या सूचीतून वगळा ! – शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद

शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद यांंची केंद्र सरकारकडे मागणी

शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद

भुवनेश्‍वर (ओडिशा) – केंद्र सरकारच्‍या सूचीमध्‍ये गायीला प्राण्‍यांच्‍या श्रेणीत ठेवण्‍यात आले आहे; परंतु भारतीय संस्‍कृतीत गायीला ‘देवी’ म्‍हटले गेले आहे. गायीला ‘माता’ म्‍हणत तिचे महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्म मानणारे गायीला माता म्‍हणतात. त्‍यामुळे गायीला प्राणी म्‍हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्‍या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपण पुढे न्‍यायला हवी. त्‍याचाच एक भाग म्‍हणून केंद्र सरकारने प्रसारित केलेल्‍या जनावरांच्‍या सूचीतून गायीला वगळावे लागणार आहे, अशी मागणी उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी ‘गो प्रतिष्‍ठा ध्‍वज प्रतिष्‍ठापना यात्रे’चे आयोजन केले आहे. ही यात्रा नुकतीच ओडिशात पोचली आहे. या वेळी त्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना वरील मागणी केली.

गोमातेचे सरंक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने कायदा करावा !

शंकराचार्य म्‍हणाले की, गायीला संरक्षण मिळवून देणे आणि गायींची सेवा करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. मी येथे गो प्रतिष्‍ठा ध्‍वज प्रतिष्‍ठापना यात्रेसाठी आलो आहे. गोमातेचे सरंक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने कायदा करावा, ही आमच्‍या या यात्रेची प्रमुख मागणी आहे. कायदा केल्‍यानंतर लोकांनाही याचे आणि सनातन धर्माचे गांभीर्य समजेल. त्‍यामुळे लोकांची विचार करण्‍याची पद्धत, गायीकडे पहाण्‍याचा दृष्‍टीकोन पालटेल. केंद्र सरकार कायदा करत नाही तोपर्यंत हे काम करत रहाणार, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

संपादकीय भूमिका

मुळात शंकराचार्यांना अशी मागणीच का करावी लागते ? सरकारला हे का कळत नाही ? आतातरी सरकार तत्‍परतेने ही मागणी मान्‍य करणार आहे का ?