सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या किती सार्थ आहेत’, याची एका सत्संगात आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मागील ३५ वर्षांपासून माझे सर्वतोपरी संगोपन केले आणि माझ्याकडून साधना करवून घेतली अन् घेत आहेत. यापुढेही ते माझ्याकडून अनेक जन्म साधना करून घेणार आहेत. असे असले, तरी ‘या जन्मी ते हयात नसतांना माझ्या साधनेचे काय होईल ?’, असा विचार कधीतरी माझ्या मनात यायचा; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आणि ‘ते किती सार्थ आहे’, हे गुरुकृपेने मला माझ्या अनुभवातून लक्षात आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी माझा विशेष संपर्क होत नाही. एकदा काही अयोग्य प्रसंग माझ्या लक्षात आले. ‘त्या संदर्भात नेमके काय करावे ?’, याविषयी मी साशंक होतो. त्याविषयी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोललो. नंतर त्यांनी अत्यंत संयमाने, वात्सल्यभावाने आणि आध्यात्मिक स्तरावर एक सत्संग घेतला. त्यामुळे मला आणि संबंधितांना साधनेची दिशा अन् प्रेरणा मिळाली. मला जाणवलेले त्यांचे दैवी गुण आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.

देवद, पनवेल येथील आश्रमभेटीत पू. शिवाजी वटकर यांची वात्सल्यभावाने विचारपूस करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अनमोल मार्गदर्शनातून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

१ अ. तत्परता आणि प्रांजळपणा : आरंभी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलतांना मला थोडा ताण आला होता. याविषयी मी त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही मनात कोणताही नकारात्मक विचार न करता आणि निष्कर्ष न काढता मला सांगितले, ते चांगले केले. त्यामुळे आपल्याला लाभच होणार आहे. इतरांविषयी तुमच्या मनात आदरच आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका.’’ त्या वेळी मला त्यांच्यातील ‘तत्परता आणि प्रांजळपणा’ हे गुण जाणवले. त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे मला आनंद मिळून माझ्यातील कृतज्ञताभाव जागृत झाला.

१ आ. आपुलकीने साधकांच्या मनाचा वेध घेऊन वात्सल्यभावाने बोलणे : नंतर साधकांचा सत्संग घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सर्व गोष्टींचा विचार करून सत्संगाचे आयोजन केले. प्रत्येक सूत्र सांगून झाल्यावर त्या ‘कुणाला काही शंका आहेत का ? कुणाला काही सांगावयाचे आहे का ?’, असे तत्त्वनिष्ठतेने; परंतु अत्यंत प्रेमाने विचारत होत्या. त्या अत्यंत आपुलकीने साधकांच्या मनाचा वेध घेत होत्या. ‘एखादा साधक नेमका कुठे न्यून पडतो ? त्याला साधनेसाठी काय आवश्यक आहे ?’ याविषयी त्या वात्सल्यभावाने सांगत होत्या.

१ इ. सकारात्मकतेमुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना प्रत्येक अडचणीमध्येही साधनेची संधी दिसणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना प्रत्येक अडचणीत साधनेची संधी दिसते. त्यामुळे त्या नेहमी सकारात्मक असतात. सत्संग चालू असतांना त्यांनी साधकांच्या कुठल्याही सूत्रांना विरोध केला नाही कि त्यांकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी साधकांचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले. त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले. सर्व चर्चा आध्यात्मिक स्तरावर झाल्यामुळे ईश्वरी अधिष्ठान असलेला तो एक ‘महासत्संग’च झाला. ‘त्यांनी केलेले मार्गदर्शन हे ईश्वरी नियोजनानुसार होते’, याची मला जाणीव झाली.

१ ई. प्रत्येक कृती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे करणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी जो सत्संग घेतला आणि मार्गदर्शन केले, त्यातील प्रत्येक शब्द अन् विचार हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असेच होते. त्यांनी प्रत्येक सूत्रावर सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. संबंधित साधकांना चिंतन करण्यास आणि ‘योग्य काय असावे ?’, हे ठरवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचा प्रत्येक शब्द आणि कृती ही ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ असते’, याची मला जाणीव झाली.

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच सत्संग घेत आहेत’, याची मला अनुभूती आली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘तत्त्वनिष्ठतेने आणि विनम्रतेने एक प्रसंग हाताळल्यावर ‘ईश्वरी राज्यात शासनकर्ते कसे असतील ?’ याचा प्रत्यय येणे

पू. शिवाजी वटकर

‘एकदा समाजातील एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीच्या मनात ‘सनातन संस्था आणि साधक’ यांच्याविषयी विकल्प निर्माण झाला होता. ‘त्यांच्यावर अन्याय झाला आहे’, असे वाटून त्यांनी त्याविषयीची सूत्रे मला सांगितली. ‘या संदर्भात काय करावे ?’ हे मला कळत नव्हते; परंतु ‘ती सूत्रे गंभीर आणि समष्टीला हानीकारक आहेत’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. त्यानुसार मी रामनाथी, गोवा येथील आश्रमात याविषयी कळवले. नंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मी कळवलेल्या प्रत्येक सूत्राचे सखोल चिंतन करून ‘योग्य काय असायला हवे ? त्यातून कोणता मार्ग काढू शकतो ? सत्य काय आहे ?’ यांविषयी मला अवगत केले. मी कळवलेल्या प्रत्येक सूत्राला त्यांनी न्याय दिला. त्यांनी अत्यंत संयमाने हा प्रसंग हाताळून प्रतिष्ठित व्यक्तीच्या मनातील विकल्प दूर केले. या प्रसंगातून मला ‘ईश्वरी राज्यात शासनकर्ते कसे असतील ?’ याचा प्रत्यय आला. ‘तत्त्वनिष्ठतेने आणि विनम्रतेने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर कसे हाताळायचे ?’ हे गुरुकृपेने मला शिकायला मिळाले.’

– (पू.) शिवाजी वटकर (३०.८.२०२४)

१ उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी स्वतःचे आदर्श बोलणे आणि वागणे यांतून इतरांना शिकवणे : सत्संगाच्या पूर्ण कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अत्यंत स्थिर राहून एका लयीत आणि ओघवत्या चैतन्यमय वाणीतून बोलत होत्या. आमच्यापुढे त्या ‘वागणे आणि बोलणे’ यांचा आदर्श निर्माण करत होत्या. तेव्हा मला पुष्कळ शिकायला मिळून आनंद होत होता. सत्संगाच्या शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘‘आता माझ्या साधनेतील अडथळा गेला आणि मला पुष्कळ शिकायला मिळाले.’’ त्या म्हणाल्या, ‘‘असेच वाटले पाहिजे. मलाही यातून शिकायला मिळाले.’’

१ ऊ. साधकांविषयी सूत्रे लिहून दिल्याविषयी पू. वटकरकाकांचे कौतुक करून त्यांना आधार देणे : सत्संग संपल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘पू. वटकरकाकांनी चांगले केले. आरंभी त्यांना ‘सूत्रे कशी सांगू ?’, अशी भीती वाटत होती; पण त्यांनी तो टप्पा पार केला. या सर्व सूत्रांतून आपल्याला शिकायला मिळाले. यातून साधकांची साधना आणि गुरुकार्य यांसाठी साहाय्य होईल !’’ त्यांचे बोलणे ऐकल्यावर मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला आणि माझी भावजागृती झाली.

१ ए. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून आध्यात्मिक स्तरावर होत असलेले कार्य

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून स्थूल आणि सूक्ष्म या स्तरांवर कार्य होते. त्यांचे कार्य आध्यात्मिक स्तरावर होत असल्याने त्यांच्या सत्संगातून प्रत्येकाला आनंदच मिळतो.

२. कोणत्याही कठीण प्रसंगात ‘समोरची व्यक्ती भगवंताचे रूप आहे’, हे ध्यानात ठेवून त्या साहाय्य करतात.

३. कठीण प्रसंग हाताळतांनाही त्या अत्यंत स्थिर आणि सकारात्मक असतात. त्यामुळे वातावरणातील स्पंदने पालटतात. संबंधित साधकांमध्येही सकारात्मकता येते आणि ते सहजतेने सर्वकाही स्वीकारण्ो आणि शिकण्ो, या स्थितीत येतात. त्यामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांचे प्रेरणास्थान बनतात.

या एकाच सत्संगातून मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील ‘उत्तम निरीक्षणक्षमता, चांगली आकलनशक्ती, नेतृत्व गुण, तत्परता, ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती, चुकांप्रती गांभीर्य अन् संवेदनशीलता’, इत्यादी दैवी गुण शिकायला मिळाले.

२. सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले प्रबोधन !

अ. ‘पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यावर तरंग उठतात. त्याप्रमाणे एखादा प्रसंग घडल्यावर आपल्या मनात अनेक विचार येऊ लागतात. त्या वेळी ‘ईश्वराला काय अपेक्षित आहे ?’ हा विचार करून कृती करावी.

आ. साधकाने स्वतःला कळलेली चूक शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न करावा. त्याने चूक न सांगण्याची मोठी चूक करू नये.

इ. एखाद्याच्या चुका सांगता येत नसतील, तर त्याविषयी उत्तरदायी साधकांना सांगावे, तसेच कुणाचे तरी साहाय्य घ्यावे. ‘यातून आपल्याला चुकणार्‍या साधकाला साहाय्य करायचे आहे’, हे कळते. साधकांनी आपले विचार तत्परतेने आणि शिकण्याच्या स्थितीत राहून संबंधितांकडे मांडले, तरच त्यांना आंतरिक समाधान मिळते.

ई. साधकांनी स्वतःच्या मनातील विचार मोकळेपणे आणि प्रांजळपणे सांगावेत. आपल्या मनात जे आहे, ते व्यक्त करता आले पाहिजे. सांगितलेले विचार योग्य असल्यास साधनेत साहाय्य होते. विचार चुकीचे असतील, तर त्यातून शिकायला मिळते. शिकण्याच्या स्थितीत राहिल्यावर ‘योग्य आणि अयोग्य काय ? ते कळते.

उ. चुका सांगणे आणि त्या स्वीकारणे, यांतून आनंद मिळतो. चुकांच्या संदर्भात साधकांनी स्वप्रतिमेचा विचार न करता ईश्वराला अपेक्षित अशी कृती करावी.

ऊ. साधकांना स्वतःच्या सर्व चुका कळू शकत नाहीत. जोपर्यंत १०० टक्के आध्यात्मिक प्रगती होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाकडून प्रत्येक टप्प्याला कमी-अधिक प्रमाणात चुका होत असतात. यासाठी साधकांनी एकमेकांना साहाय्य करायला हवे.

ए. ‘मनाची निर्मळता, प्रांजळपणा, नम्रता आणि शरणागतभाव’ हे गुण असल्यास साधकांची साधनेत कधीही हानी होत नाही.’

कृतज्ञता

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सत्संगामुळे मी ‘याची देही, याची डोळा’ श्रीसत्शक्तीरूपी भगवंताला अनुभवले’, असे म्हणावेसे वाटते ! त्यांच्या मार्गदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यावर मला ‘सकारात्मकता, स्थिरता आणि आनंदाची स्थिती’ अनुभवायला मिळाली. देवर्षि नारद यांच्या प्रत्यक्ष सत्संगाने पापी वाल्या कोळ्याचे रूपांतर अत्यंत महान अशा वाल्मीकिऋषींमध्ये झाले. त्याचप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सत्संग आणि मार्गदर्शन यांमुळे माझ्यासारख्या साधकांचा उद्धार होत आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता !

धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि धन्य त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक