धाराशिव, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे घटस्थापनेच्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्ताने श्री तुळजाभवानीची अलंकार महापूजा करण्यात आली होती. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पद्धतीने देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते विधीवत् घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी उत्साहात करण्यात आले.
१. घटकलशाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून घटकलशांची घटस्थापना देवीच्या गाभार्यात करण्यात आली, तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते विधीवत् पूजा करून घटस्थापना करण्यात आली.
२. मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा. शिस्तबद्ध पध्दतीने आणि धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात, त्यांनी वाहतूक मार्गावरून चालतांना काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी घटस्थापनेनंतर केले.
३. प्रतिवर्षीप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत आले आहेत. वेगवेगळ्या गावांतूनही युवक ‘भवानी ज्योत’ घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे चालत येत आहेत.