पुणे – रस्त्याच्या कडेला बेडशिट (पलंगपोस) विक्री करणार्या विक्रेत्यांकडून १४ सहस्र रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर २३ पलंगपोस घेणार्या २ पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे. पोलीस अंमलदार सुनील कुसाळकर आणि संजय आसवले अशी पोलिसांची नावे आहेत. ही घटना १७ सप्टेंबर या दिवशी विमाननगर परिसरामध्ये घडली होती.
अल्थमेश आणि त्याचा मित्र विमाननगर परिसरातील श्री दत्त मंदिर चौकांमध्ये पलंगपोस विक्री करत होते. त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ‘पलंगपोस विक्री करायची असेल, तर हप्ता हवा’ असे सांगून ६० पलंगपोस गाडीमध्ये टाकली. तडजोडीनंतर १४ सहस्र रुपये घेतले. त्यांनी ६० पैकी ३७ बेडशिट माघारी देऊन स्वत:कडे २३ पलंगपोस ठेवून घेतली. ‘वंचित बहुजन सामाजिक संघा’चे अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी वरिष्ठ पोलिसांकडे याविषयी तक्रार अर्ज केला. त्यानंतर पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
संपादकीय भूमिकापोलीस यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरलेली असेल, तर ती कायद्याचे राज्य देईल का ? अशा पोलिसांना निलंबित नव्हे, तर बडतर्फच करायला हवे ! |