Pakistani National Arrest : गेल्‍या ६ वर्षांपासून ‘शर्मा’ आडनाव लावून बेंगळुरूमध्‍ये रहात होते पाकिस्‍तानी कुटुंब !

पोलिसांनी केली अटक

रशीद अली सद्दिकी आणि त्‍याची पत्नी आयेशा

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे गेल्‍या ६ वर्षांपासून पाकिस्‍तानी कुटुंब शर्मा आडनाव धारण करून अवैधरित्‍या भारतात रहात होते. पोलिसांनी रशीद अली सद्दिकी (वय ४८ वर्षे), त्‍याची पत्नी आयेशा (वय ३८ वर्षे) आणि त्‍याचे सासू-सासरे हनीफ महंमद (वय ७३ वर्षे), रुबिना (वय ६१ वर्षे) यांना आनेकल तालुका जिगणी गावातून अटक केली. या कुटुंबाने अनुक्रमे शंकर शर्मा, आशा रानी, राम बाबू शर्मा आणि रानी शर्मा अशी नावे धारण केली.

१. बांगलादेशातून २ पाकिस्‍तानी नागरिक चेन्‍नई विमानतळावर उतरले होते. या वेळी विमानतळ अधिकार्‍यांना संशय आल्‍यानंतर चौकशी केली असता त्‍यांचे पारपत्र बोगस असल्‍याचे कळले. चौकशीत ते सिद्दिकी याच्‍याशी संबंधित असल्‍याचे समजले.

२. बेंगळुरू पोलीस सिद्दिकीच्‍या घरी जाऊन त्‍याची चौकशी केल्‍यानंतर तो वर्ष २०१८ पासून बेंगळुरूमध्‍ये रहात असल्‍याचे त्‍याने सांगितले. तसेच त्‍यांचे पारपत्र आणि आधारकार्ड यांवरही हिंदु नावे असल्‍याचे आढळून आले.

३. पोलिसांनी जेव्‍हा त्‍यांच्‍या घराची झडती घेतली, तेव्‍हा त्‍याच्‍या घरातील भिंतीवर ‘मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्‍न-ए-युनूस’ असे लिहिलेले होते. तसेच भिंतीवर काही मौलवींची छायाचित्रेही होती.

४. पोलिसांनी कसून चौकशी केल्‍यानंतर सिद्दिकी याने तो पाकिस्‍तानी असल्‍याचे मान्‍य  केले. तो स्‍वतः कराचीजवळील लियाकताबाद येथे रहाणारा आहे, तर त्‍याचे कुटुंबीय लाहोर येथे रहात होते. वर्ष २०११ मध्‍ये त्‍याने आयेशासमवेत ऑनलाईन लग्‍न केले होते. तेव्‍हा आयेशा तिच्‍या पालकांसह बांगलादेशामध्‍ये रहात होती. पाकिस्‍तानमध्‍ये मेहदी फाऊंडेशनचे धार्मिक कार्य करत असल्‍यामुळे सिद्दिकीला देशाबाहेर काढण्‍यात आले होते.

५. सिद्दिकी बांगलादेशमध्‍ये गेला आणि तिथे त्‍याने मेहदी फाऊंडेशनच्‍या खर्चावर पुन्‍हा धर्मप्रसार चालू केला; मात्र २०१४ मध्‍ये बांगलादेशात त्‍याला विरोध झाला. त्‍यामुळे त्‍याने भारतातील मेहदी फाऊंडेशनचे काम करणार्‍या परवेज नावाच्‍या व्‍यक्‍तीशी संपर्क साधून तो भारतात आला. बंगालच्‍या मालदा येथून एका दलालाच्‍या साहाय्‍याने सिद्दिकी आणि त्‍याची पत्नी, सासू-सासरे, नातेवाईक झैनबी नूर आणि महंमद यासीन हे अवैधरित्‍या भारतात आले. ते काही दिवस देहलीत राहिले. त्‍यानंतर त्‍यांनी शर्मा नावाने बोगस पारपत्र, आधारकार्ड आणि वाहन चालवण्‍याचा परवाना बनवला.

संपादकीय भूमिका

हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्‍जास्‍पद ! असे आणखी किती पाकिस्‍तानी आणि बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची कल्‍पना करता येत नाही ! असा देश कधीतरी सुरक्षित राहू शकेल का ?