विजेचा झटका लागून गायीचा मृत्यू झाल्यामुळे हानीभरपाई देण्याचा न्यायालयालचा विद्युत् विभागाला आदेश
चेन्नई (तमिळनाडू) : प्राण्यांना अधिकार नसले, तरी त्यांचे संरक्षण करणे, हे राज्याचेच कर्तव्य आहे, असे महत्त्वपूर्ण विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले. एका गायीचा विजेचा झटका लागल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून न्यायालयाने तमिळनाडू विद्युत् विभागाला हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला.
न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांच्या खंडपिठाने सांगितले की, राज्य, सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायती या संस्था प्राण्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास बांधील आहेत.
काय आहे प्रकरण ?संबंधित घटनेत एका व्यक्तीच्या मालकीच्या ४ गायी चरण्यासाठी जात होत्या. एका शेतात असलेल्या १०० ‘केव्हीए पॉवर’च्या ‘ट्रान्स्फॉर्मर’ला लागून असलेल्या डबक्यात एक गाय शिरली. त्या डबक्यात वीज गळती होत असल्याने गायीला विद्युत् झटका लागून तिचा जागीच मृत्यू झाला. यावरून तिच्या मालकाने न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला. |