मुंबई, २० सप्टेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील प्रतापगड ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने २० सप्टेंबर या दिवशी अंतिम अधिसूचना प्रसारित केली. यापूर्वी प्रतापगड हा ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषणा करण्यात आली होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याविषयी अधिसूचना प्रसारित करण्यात आली नव्हती. अंतिम अधिसूचना प्रसारित करून ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
प्रतापगडाची एकूण ८ हेक्टर ६४ आर् एवढी जागा राज्य संरक्षित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली वर्ष १६५६ मध्ये प्रतापगड बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी आदिलशहाचा सरदार अफझलखान याचा कोथळा याच गड्याच्या पायथ्याशी बाहेर काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पराक्रमामुळे खर्या अर्थाने प्रतापगडाचे नाव सर्वदूर पसरले.