Tirupati Laddu Row : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये माशांचे तेल, डुक्कर आणि गोमांस यांची चरबी यांचा वापर !

गुजरातमधील प्रयोगशाळेचा परीक्षण अहवाल उघड !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्यानंतर आता या लाडूच्या प्रयोगशाळेतील परीक्षणाचा अहवाल समोर आला आहे. नायडू यांच्या तेलगू देसम् पक्षाने या परीक्षणाचा अहवाल उघड केला आहे. या अहवालानुसार, या लाडूंमध्ये माशांचे तेल, डुक्कर आणि गोमांस यांची चरबी यांचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. याविषयी मंदिराच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तिरुपती मंदिराच्या ३०० वर्ष जुन्या स्वयंपाकघरात प्रतिदिन ३ लाख ५० सहस्र लाडू बनवले जातात. हा मंदिराचा मुख्य प्रसाद आहे, जो अनुमाने २०० ब्राह्मण बनवतात. हे बनवण्यासाठी शुद्ध बेसन, बुंदी, साखर, काजू आणि शुद्ध तूप यांचा वापर केला जातो.

१. गेल्या ५० वर्षांपासून कर्नाटक सहकारी दूध महासंघ मंदिराला सवलतीच्या दरात तूप पुरवठा करत होता. प्रत्येक ६ महिन्यांनी मंदिरात १ सहस्र ४०० टन तूप वापरले जाते. जुलै २०२३ मध्ये आस्थापनाने अल्प दराने पुरवठा करण्यास नकार दिला, त्यानंतर यापूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारने जुलै २०२३ मध्ये ५ आस्थापनांना तूप पुरवठ्याचे काम दिले.

२. यावर्षी १७ जुलै या दिवशी गुजरातमधील ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’च्या फूड लॅब, काल्फ(CALF)ने अहवाल दिला की, तिरुमलाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलापासून बनवलेले तूप वापरले जात आहे. तपासणीत एका आस्थापनाच्या तुपात भेसळ असल्याचे आढळून आले. यानंतर जुलैमध्ये तिरुमला ट्रस्टचे अधिकारी जे. श्यामला राव यांनी बैठक घेऊन लाडूंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले. आता तेलगू देसम पक्षाने त्याचा अहवाल उघड केला. तुपात गोमांस, माशाचे तेल आणि डुकराची चरबी मिसळल्याचे आढळून आले.

३. आंध्रप्रदेश सरकारने २९ ऑगस्टला पुन्हा कर्नाटक सहकारी दूध महासंघाला तूप पुरवठ्याचे काम दिले आहे. हा महासंघ नंदिनी ‘ब्रँड’चे देशी तूप पुरवतो. दुसरीकडे, तुपाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाने ४ सदस्यीय विशेष समिती स्थापन केली आहे.

४. काळ्या सूचीमध्ये टाकलेल्या कंत्राटदारांकडून तूप का मागवले जात होते ?, असा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मंदिर प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, काळ्या सूची असलेल्या कंत्राटदाराकडून ३२० रुपये प्रति किलो दराने गायीचे तूप खरेदी करण्यात आले. आता कर्नाटक सहकारी दूध महासंघाकडून ४७५ रुपये प्रति किलो दराने तूप खरेदी केले जात आहे.

उत्तरदायींना फाशीची शिक्षा करा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले की, मला वाटते तिरुपती प्रसादाच्या प्रकरणात सीबीआयकडून अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचेही अन्वेषण व्हायला हवे. जे दोषी असतील, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ घोटाळ्याचे नाही. आंध्रच्या पूर्वीच्या वाय.एस्.आर्. सरकारने हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्याचे कामही केले होते.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !