कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण : अनभिज्ञ गोष्टी !

कोलकाता येथील राधा गोविंद कर (‘आर्.जी. कर’) महाविद्यालयातील एका निवासी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची नृशंस हत्या करण्यात आली. यामुळे महाविद्यालयातील निवासी डॉक्टर अद्यापही आंदोलन करून न्यायाची मागणी करत आहेत. या घटनेला अनेक कंगोरे आहेत, तसेच काही माहिती अनभिज्ञ आहे, जी विविध वृत्तपत्रांमध्ये तुकड्या तुकड्याने प्रसिद्ध झाली आहे. यावर कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय येथेही सुनावणी चालू आहे. एकूणच या प्रकरणावर या लेखातून प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न…

निवासी डॉक्टर आणि जनता यांच्याकडून रोष व्यक्त

१. मुख्य आरोपी संजय रॉयची पार्श्वभूमी

कोलकाता येथील ‘आर्.जी. कर’ महाविद्यालयात वर्ष २०१६ मध्ये एक आचारी काम करत होता. त्याचे नाव संजय रॉय होते. तो अचानक एक दिवस गायब झाला आणि थेट ३ वर्षांनी तो बंगालच्या ‘सिव्हिक व्हॉलेंटिअर फोर्स’मध्ये (नागरी स्वयंसेवक बलामध्ये) सहभागी होतो. बंगालमध्ये पोलिसांना मनुष्यबळ अल्प पडत असल्यामुळे तेथील प्रशासनाने पोलिसांना साहाय्य व्हावे म्हणून नागरिकांमधून स्वयंसेवक बल सिद्ध केले होते. संजय रॉय हा या बलाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करत होता; मात्र त्याने नेत्यांच्या ओळखीने, काही खटपट करून ‘वेलफेअर’ विभागात नियुक्ती मिळवली. हा विभाग रुग्णालयांशी संबंधित होता. या विभागात सरकारी रुग्णालयातील खाटा रुग्णांना अधिक पैसे देऊन मिळवून देऊन वरकमाई करता येत असल्याने रॉय याने हा विभाग निवडला होता. आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात त्याने तेथे काही दिवसांत ओळखी आणि संपर्क करून चांगला जम बसवला होता आणि त्याला तेथील ‘ट्रॉमा’ विभाग (अपघात विभाग) आणि अतीदक्षता विभाग यांच्या सुरक्षेचे दायित्व मिळाले होते.

मुख्य आरोपी संजय रॉय

प्रत्येक पक्षाची विद्यार्थी संघटना कार्यरत असते. तृणमूल काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘तृणमूल विद्यार्थी परिषद’ आहे आणि या संघटनेचा आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयावर चांगला प्रभाव आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थी गटाच्या निवडणुकांमध्ये या तृणमूलच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित विद्यार्थी निवडून येतात आणि त्यांच्याशी संजय रॉयने चांगली जवळीक निर्माण केली होती. तो अनेक मुलांना नागरी सुरक्षा बलात नोकरीही लावून पैसे मिळवत होता. पोलीस अधिकार्‍यांसाठी महाविद्यालयात उपलब्ध असलेली एक छोटी खोली (बॅरेक) वर्ष २०२० मध्ये संजय रॉय याला तो पोलीस नसूनही उपलब्ध झाली होती. ती अनुप दत्ता या पोलीस अधिकार्‍याची होती आणि रॉयने त्याची चांगली मर्जी संपादन केली होती. संजय रॉय याचा दबदबा एवढा वाढला होता की, ‘पोलीस वेलफेअर बोर्डा’त ज्यामध्ये १४ हून अधिक पोलीस अधिकार्‍यांचा सहभाग असतो, त्यातही रॉय याला नियुक्त करण्यात आले होते आणि एवढेच नाही, तर येथील स्थानिक २ पोलीस ठाण्यांतील ६ पोलिसांचे स्थानांतर करण्यातही त्याचा सहभाग होता. संजय रॉय याने २ लग्न केली. लग्नानंतर तो दोन्ही पत्नींना मारहाण करत असे आणि त्या पत्नींचा घटस्फोट दिल्यावर संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

२. डॉ. संदीप घोष यांची पार्श्वभूमी

वर्ष २०२१ मध्ये ‘कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज’चे उपाध्यक्ष असलेले डॉ. संदीप घोष यांना आर्.जी. कर महाविद्यालयाचे प्राचार्य बनवले जाते. डॉ. घोष यांच्यावर ते नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असतांनाच आधीच वेगवेगळे आरोप होते, तरीही त्यांचे स्थानांतर या महाविद्यालयात करण्यात येते. आर्.जी. कर महाविद्यालयात उपअधीक्षक राहिलेले डॉ. अख्तर अली यांनी माध्यमांसमोर सांगितले की, संजय रॉय याने डॉ. संदीप घोष यांच्याशी एवढी जवळीक आणि त्यांच्याकडे येणे-जाणे एवढे वाढले होते की, तो त्यांच्या ‘खास’ ४ माणसांपैकी एक झाला होता. संजय रॉय आसपासच्या लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी स्वत:च्या दुचाकीवर ‘पोलीस’, असे लिहित असे आणि ‘पोलीस’ लिहिलेले टी-शर्ट घालत होता.

तत्कालीन प्राचार्य डॉक्टर संदीप घोष

वर्ष २०२३ मध्ये डॉ. संदीप घोष यांची एकूण कार्यपद्धत आणि वागणे यांविरुद्ध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याकडून आवाज उठण्यास प्रारंभ झाला. डॉ. घोष भ्रष्टाचारी असल्याचे आरोप होते. मानवी अवयवांच्या तस्करीत ते सहभागी आहेत, असे आरोप होऊ लागले. याचे कारण म्हणजे बंगाल आरोग्य विभागाचे सचिव देबाल कुमार घोष यांच्या चौकशीचा अहवाल समोर आला होता. त्यामध्ये डॉ. संदीप घोष यांच्यावर त्यांनी ‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण आणि बांधकाम कार्य यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे’, असे आरोप होत होते. त्यांनी संबंधित कंत्राटदारासमवेत एक गुप्त करार केला होता. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचा जैविक कचरा (सिरींज, ग्लोव्हज इत्यादी) जो नष्ट करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो, तो कचरा नष्ट करण्याऐवजी खुल्या बाजारात विकून त्यापैकी २० टक्के ‘कट’ (दलाली) स्वत:साठी ठेवत असत. काही सरकारी कर्मचारीही यामध्ये सहभागी होते. (या जैविक कचर्‍यातील वस्तूंचा पुन्हा वापर करणे धोक्याचे असते, त्यातून आजार पसरू शकतात. त्यामुळे तो नष्ट करणेच आवश्यक असते.) त्यामुळे ‘घोष यांच्यावर कारवाई व्हावी’, असे त्या अहवालात लिहिले होते. त्यामुळे विद्यार्थीवर्ग, कर्मचारीवर्ग संतप्त होता. डॉ. अख्तर अली यांना या गोष्टी लक्षात आल्यावर त्यांनीही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस आणि बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या सर्वांना डॉ. घोष यांच्या अनागोंदी कारभाराविषयी अहवाल सिद्ध करून पाठवला, त्याचा पाठपुरावा घेतला; मात्र झाले उलटेच डॉ. अख्तर अली यांचेच स्थानांतर झाले.

३. विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त

श्री. यज्ञेश सावंत

यानंतर विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, ते प्राचार्यांच्या विरोधात गेल्याने त्यांना परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण केले जात होते. ज्यांना लेखी परीक्षेत १०० पैकी ७० गुण मिळाले, त्यांना प्रायोगिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले. त्यांना ‘इंटर्नशीप’ पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात नव्हते, ज्यामुळे त्यांना वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करता येत नव्हती. काही विद्यार्थी यामुळे निराश होऊन प्राचार्यांच्या अंगावर धावूनही गेले. ज्यामुळे प्राचार्यांना खासगी सुरक्षारक्षक (बाऊन्सर्स) ठेवावे लागत.

४. संजय रॉयकडून महिला-मुली यांचा विनयभंग

जून २०२४ मध्ये एक घटना घडली होती. एका गरजू महिलेला तिच्या बाळाच्या उपचारांसाठी संजय रॉय या महाविद्यालयात बेड मिळवून देण्यास साहाय्य करतो. नंतर रॉय या महिलेचा भ्रमणभाष क्रमांक मिळवतो आणि तिला वाईट, अश्लील लघुसंदेश पाठवत रहातो, तिला भेटण्यास बोलावतो. त्यामुळे त्रस्त होऊन ती महिला कोलकाता येथील पोलीस मुख्यालयात संजय रॉय विरुद्ध तक्रार करते. आश्चर्य म्हणजे रॉय विरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही वा त्याला नागरी सुरक्षा बलातून काढले जात नाही. संजय रॉय हा याच महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या डॉक्टर मुलीचा विनयभंग करतो. याविषयीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्याचा उद्दामपणा वाढत जातो.

५. प्रत्यक्ष घटनेचा दिवस

८ ऑगस्ट २०२४ चा दिवस उजाडतो. या दिवशी संजय रॉय याच्या एका मित्राच्या कुटुंबियांचे शस्त्रकर्म चालू असते. ते पूर्ण होईपर्यंत हा मित्र जो स्वत:ही नागरी सुरक्षा बलाचा सदस्य आहे, तो आणि संजय रॉय रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात रात्री बसून मद्यपान करत होते. मद्यपान केल्यानंतर रुग्णालयापासून थोड्या दूर अंतरावर सोनागाची नावाचा वेश्यावस्तीचा भाग आहे, तेथे ते जातात. तेथे त्याचा मित्र एका खोलीत जातो आणि संजय रॉय तो येईपर्यंत रस्त्यावरून ये-जा करणार्‍या मुली-महिला यांची छेडछाड करतो. तेथून ते पुढे आणखी एका वेश्यावस्तीच्या भागात जातात. त्यानंतर संजय रॉय पुन्हा मद्यपान करतो, अश्लील चित्रपट पहातो आणि मध्यरात्री २ ते २.३० च्या सुमारास रुग्णालयात परत येतो. याच वेळी रुग्णालयातील निवासी डॉक्टर मुलगी जी तेथे ‘एम्.डी.’चे (वैद्यकशास्त्रातील डॉक्टरची पदवी) शिक्षण घेत होती, ती ३६ घंट्यांचे काम करून विश्रांतीसाठी आली होती. ती तिच्या अन्य २ कनिष्ठ डॉक्टरांसमेवत काही वेळ टीव्ही पहाण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये जाते. पुढे ते अन्य २ डॉक्टर निघून जातात, तर पीडिता तेथेच थांबून अभ्यास करते. (रुग्णालयात जे डॉक्टर विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांना ‘निवासी डॉक्टर’ म्हणतात. या डॉक्टरांना पुष्कळ काम असते. त्यामुळे त्यांचे रहाणे, खाणे सर्व रुग्णालयात असते. एक प्रकारे रुग्णालयातच त्यांचे निवास असते.) रात्री २.३० वाजता एका रुग्णाविषयी काही निरोप देऊन ती तिचे वैयक्तिक संदेश पाठवून सेमिनार हॉलमध्ये ब्लँकेट अंगावर घेऊन झोपी जाते. (रुग्णालयाच्या झोपण्याच्या खोलीत काही वैद्यकीय चाचण्या चालू असल्यामुळे ती सेमिनार हॉलमध्येच झोपली.) याच वेळी संजय रॉय जो मद्याच्या नशेत असतो, त्याच्याविषयी सीसीटीव्हीमध्ये लक्षात येते की, तो रुग्णालयाच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आत-बाहेर करत होता. जणूकाही तो कुणी महिला डॉक्टरच्या शोधात होता. पहाटे ४ वाजता तो सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करतो. सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करतांना रॉय याच्या गळ्यात एक ‘ब्लू टूथ’ उपकरण असते, जे हॉलमधून बाहेर पडतांना त्याच्या गळ्यात नसते. यावरून तो नंतर पकडला गेला होता. सेमिनार हॉलमध्ये शिरून पीडितेवर थेट आक्रमण करतो, तिला मारहाण करतो, बलात्कार करतो; मात्र सेमिनार हॉल आवाजरोधक असल्याने कोणताही आवाज बाहेर जात नाही. तो जवळपास ४० मिनिटे तेथे असतो आणि पीडितेवर बलात्कार करून अन् तिची हत्या करून शांतपणे रुग्णालयातील त्याच्या खोलीत झोपी जातो.

६. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचे संशयास्पद वागणे

या घटनेविषयी जेव्हा डॉ. संदीप घोष यांना कळवले जाते, तेव्हा ते त्वरित पोलिसांना न कळवता स्वत: येऊन पहातात आणि अनुमाने १ घंट्याने पोलिसांना कळवतात. महाविद्यालयाचे उपप्रमुख पीडितेच्या आई-वडिलांना ‘तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे’, असे कळवतात. पालक महाविद्यालयात येऊनही त्यांना ३ घंटे ताटकळत ठेवण्यात येते. जेव्हा ते मुलीचा मृतदेह पहातात, तेव्हा ‘ही आत्महत्या नसून मारहाण करून केलेली हत्या आहे’, असे ते सांगतात. ही गोष्ट रुग्णालयात पसरल्यावर मुलीचे मित्र डॉक्टर आणि अन्य काही डॉक्टर यांना काय घटना घडली आहे ? याचा अंदाज येतो. मुलीचा मृतदेह सायंकाळी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येतो, तेव्हा मुलीची मैत्रीण असलेली डॉक्टर याचे चित्रीकरण करण्याचा आग्रह धरते. शवविच्छेदन अहवालामध्ये अनेक गंभीर गोष्टी समोर येतात. त्यानंतर घाईतच म्हणजे अत्यसंस्कारांसाठी असलेले काही मृतदेह डावलून पीडितेच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येतात. मुख्य म्हणजे हे सर्व होतांना पोलिसांकडे प्रथमदर्शी माहिती अहवालच नोंदवलेला नसतो. मुलीचे वडीलच पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) करतात. सेमिनार हॉलपासून अवघ्या २० मीटर अंतरावर बांधकामाचे एक काम घटनेच्या दुसर्‍याच दिवशी चालू करण्यात येते. एवढी मोठी दुर्घटना घडूनही रुग्णालय प्रशासन काहीतरी लपवत असल्याची विद्यार्थ्यांची भावना होते.

७. रुग्णालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण

कोलकाता येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनी फेसबुकद्वारे विद्यार्थ्यांना पूर्ण रात्र आंदोलन करण्याचे आवाहन करते आणि अनेक विद्यार्थी महाविद्यालयात गोळा होऊन आंदोलन चालू करतात. तेव्हाच अनुमाने ७ सहस्रांहून अधिक अनोळखी लोकांचा जमाव बॅरिकेड्स आणि प्रवेशद्वार तोडून महाविद्यालयात शिरतो अन् तेथील वस्तू, यंत्रे, सीसीटीव्ही यांची तोडफोड करतो. हे लोक एवढे आक्रमक असतात की, आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस पळून जातात. या अनोळखी लोकांची छायाचित्रे ‘इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाने प्रसिद्ध केली, त्यामध्ये काहींची ओळख पटवल्यावर बहुतांश जण तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. यातून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

८. महाविद्यालयात आत्महत्यांचा (?) भयानक इतिहास

या महाविद्यालयाचा इतिहास भयानक आहे. महाविद्यालयात वर्ष २००१ मध्ये शिक्षण घेणारा सौमित्र बिस्वास याने त्याच्या आई-वडिलांना संपर्क करून सांगितले होते की, या महाविद्यालयात काहीतरी गडबड चालू आहे. येथील व्यवहार संशयास्पद वाटतात; मात्र त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याने आत्महत्या केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून आई-वडिलांना कळवण्यात येते. या प्रकरणाविषयी पोलिसांच्या चौकशीत काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, या महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचे काही शक्तीशाली लोक महाविद्यालयात अश्लील चित्रपट बनवतात. जवळच्या सोनागाची येथून काही महिलांना महाविद्यालयात आणून हे चित्रपट बनवले जातात. त्यांच्या चेहर्‍याच्या जागी अभिनेत्री, तर काही वेळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे चेहरे लावले जातात. महाविद्यालयात मुलींचे मृतदेह आल्यावर त्यांचा वापर अश्लील चित्रीकरणासाठी केला जायचा. यानंतर वर्ष २००३ मध्ये अर्जित दत्ता, वर्ष २०१६ मध्ये गौतम पाल, वर्ष २०२० मध्ये पौलमी शहा, आणखी एक विद्यार्थिनी यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एवढ्या जणांविषयी महाविद्यालय प्रशासनाकडून ‘त्यांनी आत्महत्या केल्या’, असेच लेबल लावले आहे. यामुळेच आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही आणि आता विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळत आहे.

यातून निश्चितपणे महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात अयोग्य गोष्टी कुणा राजकीय व्यक्तीच्या पाठबळाने होत आहेत. त्यात डॉक्टरांना जीव गमवावा लागत आहे, हे लक्षात येते. याचे योग्य ते अन्वेषण होऊन दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र ममता यांच्या राज्यात ते होणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन चालूच राहील, असे दिसते.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१२.९.२०२४)

संपादकीय भूमिका 

सत्ताधारी वा लोकप्रतिनिधी यांच्या बळावर गुंड आणि बलात्कारी यांना आश्रय दिला जाणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक !